काळ आला होता, पण वेळ आली नव्हती… वरंधा घाटात एसटी दरीत कोसळली; 17 प्रवासी बालबाल बचावले

रामदास पठार येथून निघालेली एसटी महाडच्या दिशेने सुसाट जात होती. मात्र वरंधा घाटात एका वळणावर लालपरीचे अचानक ब्रेक फेल झाले आणि ही बस थेट 50 फूट दरीत कोसळली. अपघाताची माहिती कळताच आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत बसमधील प्रवाशांना बाहेर काढले. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी 17 प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी महाड येथे दाखल करण्यात आले आहे. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती अशीच प्रतिक्रिया अनेक जण हा भयंकर अपघात पाहून देत होते.

अपघातग्रस्त बस (एमएच 20, बीएल 3822) महाड आगाराची असून ही एसटी रामदास पठार येथून महाडकडे येत होती. अठरा प्रवासी या बसमधून प्रवास करीत होते. वरंधा घाटातील बेबीचा गोल या वळणावर बसचे ब्रेक निकामी झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्याने अक्षरशः ब्रेकवर उभे राहून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र ब्रेक न लागल्याने ही बस सुरक्षा कठड्यावर आढळून सुमारे पन्नास फूट दरीत कोसळली. घाटात बस कोसळल्याची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमी आणि बसमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना बाहेर काढून महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी रवाना केले.

जखमींमध्ये सुभद्रा धनावडे (65), हनुमंत दिघे (50 रा. माझेरी), राजेश साळुंखे (53, रा. शिरगाव), काशिबाई जाधव (70, रा. रामदास पठार), ज्ञानदेव जाधव (75, रा. रामदास बडघर), साईजा मालुसरे (6, रा. ठाणे), आशा मालुसरे (55, रा. पारमाची), रघुनाथ मालुसरे (58, रा. पारमाची), दगडाबाई पांडे (77, रा. तळीये), तुळशीबाई यादव (65, रा. तळीये), मंदा पवार (रा. पारमाची), सुवर्णा धनावडे (45, रा. वरंधा), कांचन मालुसरे (40, रा. पारमाची), सुप्रिया धनावडे (55, रा. वरंध), नीलिमा पोळ (30, रा. तळीये), अर्थव पोळ (5, रा. तळीये) यांचा समावेश आहे

प्रवाशांनी केला देवाचा धावा

चालक ब्रेकवर अक्षरशः उभा राहून गाडी थांबवत असल्याचे पाहून प्रवासी अचंबित झाले. त्यातील काही जणांनी नेमके हे काय सुरू आहे असे विचारताच चालकाने गाडीचा ब्रेक फेल झाला असल्याची माहिती दिली. त्यामुळे सर्वांचीच पाचावर धारण बसली. प्रवाशांनी देवाचा धावा सुरू केला. दरम्यान, ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी असलेल्या सुरक्षा कठड्याचे काम अपूर्ण झाले आहे. हे काम पूर्ण झाले असते तर कदाचित ही बस दरीत कोसळली नसती.

टँकरखाली स्कुटी चिरडलीः कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू

पनवेल अचानक वळण घेतलेल्या टँकरच्या चाकाखाली स्कुटी सापडल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना मुंबई-पुणे महामार्गावर कोनगावाच्या हद्दीत शुक्रवारी रात्री घडली. मृतांमध्ये शोबित सालुजा, त्यांची पत्नी जुई सालुजा आणि मुलगी लाडो सालुजा यांचा समावेश आहे. हे तिघेही आपल्या स्कुटीवरून मुंबई-पुणे महामार्गावरून जात असताना गोल्डन नाईट बारसमोर समोरून येणाऱ्या टँकरने अचानक वळण घेतले. त्यामुळे त्यांची स्कुटी टँकरच्या चाकाखाली चिरडली गेली. या अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे तिघांचाही जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पनवेल तालुका ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Comments are closed.