प्रयागराजमध्ये आजपासून महाकुंभ मेळा सुरू होत आहे
जगातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा, 4 जागतिक विक्रम घडणार
वृत्तसंस्था/ प्रयागराज
आजपासून म्हणजेच 13 जानेवारीपासून प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरू होत आहे. जगातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा अशी ओळख असलेला हा महाकुंभ प्रयागराजमध्ये सुरू होत आहे. पुढील 45 दिवस कोट्यावधी लोक पवित्र स्नानासाठी संगमात डुबकी मारतील. हा महाकुंभ अनेक प्रकारे खास असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात तयारी, सुरक्षा व्यवस्था आणि अनेक नवीन कार्यक्रमांचा समावेश आहे.
कुंभमेळ्याचे महत्त्व केवळ धार्मिकच नाही तर त्याला ज्योतिषशास्त्राrय आधार देखील आहे. कुंभमेळा दर 12 वर्षांनी एकदा येतो. हरिद्वार, नाशिक, प्रयागराज आणि उज्जैन या भारतातील चार प्राचीन शहरांमध्ये हा सोहळा आयोजित केला जातो. या संगमाच्या पवित्र पाण्यात पवित्र स्नान करण्याची आणि पूजा करण्याची ही सर्वात मोठी संधी आहे. भाविकांच्या प्रचंड जनसमुदायामुळे यंदाच्या सोहळ्यात अनेक विक्रमांची नोंद होणार आहे.
कुंभमेळ्यात स्नान केल्याने पापांपासून मुक्ती मिळते असे मानले जाते. समुद्रमंथनातून मिळालेले अमृत मिळविण्यासाठी देव आणि दानवांमध्ये 12 वर्षे युद्ध झाले. या युद्धादरम्यान ज्याठिकाणी अमृताचे थेंब पडले त्याठिकाणी कुंभमेळा आयोजित केला जातो. महाकुंभातील स्नानाला शाही स्नान म्हणून ओळखले जाते.
कोट्यावधी भाविक एकवटणार
पूर्वी अलाहाबाद म्हणून ओळखले जाणारे प्रयागराज आजपासून जगातील सर्वात मोठ्या जनसभेचे आयोजन करेल. गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती यांच्या संगमावर 4 हजार हेक्टरवर पसरलेला एक तात्पुरता जिल्हा तयार करण्यात आला असून तेथे पुढील 45 दिवसांसाठी देश-विदेशातील लाखो भाविक पवित्र स्नानासाठी येतील. या महाकुंभासाठी सुमारे 12,670 कोटी रुपयांचे बजेट ठेवण्यात आले असून त्यामध्ये केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारने मिळून 410 हून अधिक प्रकल्प पूर्ण केले आहेत. 45 दिवसांचा हा कालावधी प्रशासनासाठी एक मोठी परीक्षा असेल. या काळात प्रशासनाला वीज-पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, सुरक्षा, गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन आणि आपत्कालीन सेवा यासारख्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल.
12 वर्षांतून एकदा आयोजन
महाकुंभाला पूर्वी पूर्ण कुंभ म्हटले जात असे. दर 12 वर्षांनी एकदा हा सोहळा आयोजित केला जात असे. जानेवारी 2018 मध्ये उत्तर प्रदेश सरकारने पूर्ण कुंभाचे नाव बदलून ‘महाकुंभ’ असे केले. त्याचप्रमाणे, दर सहा वर्षांनी होणाऱ्या अर्धकुंभाला ‘कुंभमेळा’ असे नाव देण्यात आले. त्याचवर्षी अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज असे ठेवण्यात आले.
संगमावर 40 कोटी लोक स्नान करणार
यंदा महाकुंभ 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला असून भाविकांची संगमात गर्दी होऊ लागली आहे. महाकुंभात सुमारे 40 कोटी लोक येऊ शकतात असा प्रशासनाचा दावा आहे. हे भारताच्या एकूण लोकसंख्येच्या अंदाजे एक चतुर्थांश आहे. जर हा अंदाज खरा ठरला तर दररोज सरासरी 90 लाख लोक महाकुंभाला भेट देतील असा दावा केला जात आहे.
Comments are closed.