महाकुभ भारताची क्षमता दर्शवितो
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकसभेत प्रतिपादन
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याचे उत्कृष्ट व्यवस्थापन करुन भारताने साऱ्या जगाला आपल्या क्षमतेचे दर्शन घडविले आहे, अशी भलावण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. मंगळवारी ते लोकसभेत वक्तव्य करीत होते. या महान धार्मिक महोत्सावामुळे भारताची एकात्मता आणखी सामर्थ्यवान झाली आहे. महाकुंभ व्यवस्थापनाचे यश हे साऱ्यांच्या प्रयत्नांमधून जन्मलेले आहे. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने जनतेचे आहे, असे उद्गार त्यांनी त्यांच्या वक्तव्यात काढले आहेत.
स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन भाषण करताना मी नेहमीच देशाच्या विकासात सर्वांचा प्रयत्न किती महत्वाचा असतो, यासंबंधी बोललो आहे. महाकुंभमेळ्याचे यशस्वी व्यवस्थापन हे याचेच द्योतक आहे. ज्यांनी ज्यांनी या महाकुंभाच्या यशस्वी नियोजनात महत्वाची भूमिका साकारली आहे, त्या सर्वांचे मी या सभागृहाच्या वतीने अभिनंदन करतो. आपला देश नद्यांनी समृद्ध आहे. प्रत्येकाने या नद्यांच्या संवर्धनासाठी कार्य करण्याची आवश्यकता आहे. प्रयागराज येथील महाकुंभपर्वणीत कोट्यावधींच्या संख्येने भाविकांनी भाग घेतला. इतक्या मोठ्या संख्येचे सुनियोजित पद्धतीने व्यवस्थापन करणे ही खरोखरच आव्हानात्मक बाब होती. तथापि, प्रशासन, सर्वसामान्य लोक आणि स्थानिक लोक यांच्या एकत्रित कार्यामुळे हे आव्हान यशस्वीरित्या स्वीकारण्यात आम्ही यशस्वी ठरलो, असे प्रतिपादन त्यांनी केले.
66.21 कोटी भाविकांचा सहभाग
महाशिवरात्रीला सांगता झालेल्या या महाकुंभमेळ्यात यावेळी विक्रमी 66 कोटी 21 लक्ष भाविक सहभागी झाले होते, अशी माहिती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाकुंभमेळ्यानंतर दिली होती. 13 जानेवारी 2025 ते 26 फेब्रुवारी 2025 या काळात या महाकुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ही पर्वणी साधण्यासाठी केवळ भारतातूनच नव्हे, तर अनेक देशांमधून भाविक आले होते. त्यांच्यात सर्वसामान्य माणसांपासून कलाकार, खेळाडू, विविध क्षेत्रांमधील प्रतिभावंत, कवी, अभिनेते आदी विशेष व्यक्तीमत्वांचाही समावेश होता.
अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था
महाकुंभमेळ्याच्या काळात प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचाही आधार घेण्यात आला होता. तसेच ड्रोन्सची व्यवस्था, आपत्कालीन साहाय्यता व्यवस्था आणि कोट्यावधी भाविकांचा आहार, पाणी आणि आरोग्यव्यवस्थाही चोख ठेवण्यात आली होती, असे अनेक प्रत्यक्षदर्शींनी स्पष्ट केले होते. केंद्र सरकारनेही राज्य सरकारला यासंदर्भात मोलाचे सहकार्य केले होते, अशीही माहिती देण्यात येत आहे.
Comments are closed.