National Games 2025: जगज्जेत्यांना नमवत महाराष्ट्राचा दुहेरी सुवर्णवेध, गाथा-सुखमणी जोडीची मिश्र दुहेरीत शूट ऑफमध्ये बाजी
![Untitled design (9)](https://marathi.tezzbuzz.com/wp-content/uploads/2025/02/Untitled-design-9-696x447.jpg)
महाराष्ट्राच्या तिरंदाजांनी ऑलिम्पियन आणि वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूंच्या झारखंडला नमवित 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत रिकर्व्ह प्रकारात गुरुवारी दोन सुवर्णपदके जिंकून धमाका केला.
गाथा खडके व सुखमणी बाबरेकर जोडीने शूट ऑफपर्यंत ताणलेल्या रिकर्व्ह मिश्र दुहेरीच्या लढतीत बाजी मारत सुवर्णभेद साधला. याचबरोबर गाथा खडके, वैष्णवी पवार व शर्वरी शेंडे या त्रिकुटाने रिकर्व्ह महिलांच्या सांघिक प्रकारात सुवर्ण पदकाला गवसणी घातली.
राजीव गांधी क्रिकेट स्टेडियममध्ये ही स्पर्धा सुरू आहे. गाथा खडके व सुखमणी बाबरेकर जोडीने हरयाणाच्या पारस हुडा व भजन कौर या जोडीला तोडीस तोड लढत दिली. उभय जोडय़ामध्ये 1-1 गुणासाठी पाठशिवणीचा खेळ रंगला होता. शेवटी ही लढत 4-4 अशी बरोबरीत सुटल्याने शूट ऑफमध्ये गेली. शूट ऑफमध्ये वन ऍरो शूटमध्ये विजय प्रस्थापित करत सुवर्ण पदक पटकाविले. हरयाणाच्या जोडीने 9, 9 असा वेध घेतला. मग गाथानेही 9 गुणांचाच वेध घेतल्याने महाराष्ट्राची धाकधूक वाढली होती, मात्र बाबरेकरने मोक्याच्या वेळी 10 गुणांचा वेध घेत महाराष्ट्राला सुवर्ण पदक जिंकून दिले.
गाथा खडके, वैष्णवी पवार, शर्वरी शेंडे व मुक्ता मोडगी यांनी सांघिक महिला गटातून झारखंडच्या दीपिका कुमारी, अंकिता भगत व कोमालिका बारी या स्टार खेळाडूंनी सजलेल्या संघाचा 6-1 फरकाने पराभव करून महाराष्ट्राच्या झोळीत सुवर्णपदक टाकले. या संघास समीर म्हस्के यांनी मार्गदर्शक म्हणून काम पाहिले. महाराष्ट्राने ही दोन सुवर्ण पदके जिंकल्यानंतर महाराष्ट्राचे खेळाडू व चाहत्यांनी ‘जय शिवाजी, जय भवानी’, ‘जय महाराष्ट्र टीम महाराष्ट्र’ अशा घोषणा देत मैदान दणाणून सोडले.
महाराष्ट्राच्या आर्चरी संघाचे संघ व्यवस्थापक म्हणून प्रवीण गडदे हे, तर संघ मार्गदर्शक म्हणून प्रवीण सावंत, समीर म्हस्के, कुणाल तावरे व अमर जाधव हे काम पाहत आहेत. आजच्या सुवर्ण कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार, सचिव नामदेव शिरगावकर, पथक प्रमुख संजय शेटे, उपपथक प्रमुख सुनील पूर्णपात्रे आदींसह संघटनेचे पदाधिकारी खेळाडू आणि क्रीडाप्रेमींनी अभिनंदन केले आहे.
Comments are closed.