Maharashtra Budget 2025 Ajit Pawar makes a big announcement glorifying Marathi
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सोमवारी (ता. 10 मार्च) विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. यावेळी पवारांनी मराठी भाषेचा गौरव करणारी कविता म्हटली.
मुंबई : राज्याचा 2025-26 चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी तब्बल 11 व्यांदा अर्थसंकल्प सादर केला. तर नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर या सरकारने पहिलाच अर्थसंकल्प सादर केला. त्यामुळे या बजेटमधून सर्वसामान्यांना काय काय मिळणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. या अर्थसंकल्पातून सरकारने अनेक महत्त्वाच्या घोषणा केलेल्या असतानाच “अभिजात मराठी भाषा सन्मान दिना”बाबत सुद्धा अर्थमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. 3 ऑक्टोबरला 2024 ला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आल्याने या दिवसाबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. (Maharashtra Budget 2025 Ajit Pawar makes a big announcement glorifying Marathi)
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सोमवारी (ता. 10 मार्च) विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. यावेळी पवारांनी मराठी भाषेचा गौरव करणारी कविता म्हटली. यावेळी ते म्हणाले की, “भावफुलांना पायी उधळून आयुष्याचा कापूर जाळुन तुझे सारखे करीन पूजन, गीत तुझे मी आई गाईन शब्दोशब्दी अमृत ओतून…” तर, मायमराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अजित पवारांनी आभार मांडले. आपल्या मायमराठीस केंद्रीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 3 ऑक्टोबर, 2024 रोजी झालेल्या बैठकीत अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल राज्यातील जनतेच्या आणि जगभरातील मराठी भाषिकांच्यावतीने मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी महोदयांचे मन:पूर्वक आभार मानतो, असे अजित पवार यावेळी म्हणाले.
हेही वाचा… Maharashtra Budget Session 2025 : मेट्रो, विमानतळ अन् रस्ते…; दळणवळणासंदर्भात राज्य सरकारचे निर्णय
तसेच, यापुढे दरवर्षी 3 ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा सन्मान दिन, तर 3 ते 9 ऑक्टोबरदरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह’ साजरा करण्यात येईल. मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूर येथे अभिजात मराठी भाषेच्या संशोधन व अध्ययनासाठी उच्च दर्जाचे संशोधन केंद्र तसेच अनुवाद अकादमी स्थापित करण्यात येणार आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून अभिजात मराठी भाषाविषयक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. मराठी भाषेच्या संशोधनातील उल्लेखनीय कामगिरीसाठी पुरस्कार सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती यावेळी अर्थमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली.
Comments are closed.