Maharashtra Budget 2025 FM Ajit Pawar big announcement for Gadchiroli and Vidarbha


मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (10 मार्च) विधिमंडळात राज्याचा 2025 – 2026 वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी अनेक जिल्ह्यांच्या विकासासाठी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. देवेंद्र फडणवीस यांचे नवे सरकार स्थापन झाल्यापासून गडचिरोली जिल्ह्याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. अशामध्ये सोमवारी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात गडचिरोलीसह विदर्भासाठी अनेक घोषणा केल्या आहेत. तसेच, विदर्भातील नागपूर, अमरावतीसह इतर जिल्ह्यांसाठीही अनेक घोषणा केल्या आहेत. (Maharashtra Budget 2025 FM Ajit Pawar big announcement for Gadchiroli and Vidarbha)

हेही वाचा : Maharashtra Budget 2025: मर्सिडिजचे भाव वाढवले नाही; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना मिश्किल टोला, शिंदेंसोबत नजरानजरही नाही 

नक्षलवादी जिल्हा ओळख असणारा गडचिरोली जिल्हा आता स्टील हब म्हणून आता ओळखला जाणार आहे. “दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये गडचिरोली जिल्ह्याकरिता 21 हजार 830 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीचे सामंजस्य करार करण्यात आले. त्यामधून 7 हजार 500 रोजगार निर्मिती होणे अपेक्षित आहे,” असे अर्थमंत्री अजित पवार म्हणाले. तसेच, “गडचिरोली जिल्ह्यातील दळणवळणासाठी खनिकर्म महामार्गांचे जाळे विकसित केले जात आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात सुमारे 500 कोटी रुपये किंमतीची कामे हाती घेण्यात येणार आहेत.” असे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितले. गडचिरोली येथील नवीन विमानतळाच्या सर्वेक्षण आणि अन्वेषणाची काम सुरू असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवारांनी दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्रादेवी हा 760 किलोमीटर लांबीचा 86 हजार 300 कोटी रुपयांच्या महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादन कार्याची कामे प्रगतीपथावर आहेत. तसेच, मुंबई, नागपूर आणि पुणे महानगरांमधील नागरिकांना पर्यावरणपूरक, शाश्वत, विनाअडथळा आणि वातानुकुलित वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एकूण 143.57 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित करण्यात आले आहेत. तर, नागपूर मेट्रोचा 40 किलोमीटर लांबीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. दुसऱ्या टप्प्यात 6 हजार 708 कोटी रुपये किंमतीचे 43.80 किलोमीटर लांबीचे काम प्रगतीपथावर आहे.” अशी माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा : Maharashtra Budget 2025 : संगमेश्वरात संभाजी महाराजांचे भव्य स्मारक, अर्थसंकल्पात मोठी घोषणा 

अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली की, “नागपूरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे खाजगी सहभागामधून श्रेणीवर्धन आणि आधुनिकीकरण करण्यात येत आहे. प्रवासी आणि मालवाहतूक क्षमतेत वृध्दी होणार आहे. विदर्भाच्या सर्वांगीण आर्थिक विकासाला यामुळे चालना मिळणार आहे. तसेच, गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पातून डिसेंबर 2024 अखेर 12 हजार 332 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. हा प्रकल्प जून 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सन 2025-26 करिता 1 हजार 460 कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित आहे.”

“शासनाने महत्वाकांक्षी तापी महापुनर्भरण हा 19 हजार 300 कोटी रुपये किंमतीचा सिंचन प्रकल्प हाती घेण्याचे ठरवले आहे. या प्रकल्पामुळे उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भातील खारपाण पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. तसेच, अमरावतीमधील बेलोरा विमानतळाचे काम पूर्ण झाले आहे. इथून 31 मार्च 2025 पासून प्रवासी सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. अकोला विमानतळाच्या विस्तारासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.” अशी माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.



Source link

Comments are closed.