Maharashtra Budget 2025 NCP SP Jayant Patil criticized Mahayuti Government


मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा अर्थसंकल्प सोमवारी (10 मार्च) विधिमंडळात मांडण्यात आला. या अर्थसंकल्पावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सडकून टीका केली आहे. “जे गाडीतून फिरणार आहेत त्यांच्यासाठी असंख्य पूल, टनेलच्या घोषणा केल्या आहेत. पण एसटी बसने, रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य, गरीब, मध्यमवर्गीयांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले गेले आहे.” असे म्हणत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. तसेच, हा अर्थसंकल्प म्हणजे सर्वसामान्य लोकांची थट्टा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (Maharashtra Budget 2025 NCP SP Jayant Patil criticized Mahayuti Government)

हेही वाचा : Maharashtra Budget 2025: मर्सिडीजचे भाव वाढवले नाही; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना मिश्किल टोला, शिंदेंसोबत नजरानजरही नाही 

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, “महाराष्ट्राचे महसुली तूट ही 20 हजार कोटीवरून वाढून 45 हजार 892 कोटी दाखवली आहे. गेल्या वर्षी 20 हजार कोटींची तूट दाखवलेली ती 26 हजार 536 कोटींवर सुधारित अंदाजाने पोहोचली. म्हणेज एकूण तूट 60 हजार कोटींपर्यंत जाणार आहे. राजकोषीय तूट देखील 1 लाख 10 हजार कोटीवरून आज ती 1 लाख 36 हजार कोटींवर गेली आहे. हा आकडादेखील दीड लाख कोटींपर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही.” असे म्हणत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच, ते पुढे म्हणाले की, “अधिक्याचे बजेट करण्याची परंपरा या सरकारने गेल्या काही काळात तोडलेली आहे. त्याचा फटका सर्वांनाच विशेषता आदिवासी आणि सामाजिक न्याय विभागातील योजनांवर होत आहे. सरकारने जाहीर केलेल्या योजना सेव्हन हेवनसारख्या आहेत. जे गाडीतून फिरणार आहेत त्यांच्यासाठी असंख्य पूल, टनेलच्या घोषणा आहेत. पण एसटी बसने, रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य, गरीब, मध्यमवर्गीय लोकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे.” असे ते पुढे म्हणाले.

“शिवभोजन योजनेचा कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे ती बंद करण्याचा सरकारचा दृष्टिकोन दिसतोय अशी आमची शंका आहे. आनंदाचा शिधा यावरसुद्धा भर देण्यात आलेला नाही. कारण आता निवडणुका नाहीत. त्यामुळे या योजनांची गरज फारशी राहिलेली नाही. निवडणुकीमध्ये केल्या गेलेल्या कुठल्याही घोषणेची पूर्तता या बजेटमध्ये केली गेलेली नाही. लाडकी बहीण योजनेचे अनुदान 1500 वरून 2100 होण्याची अपेक्षा होती, पण तेही घडले नाही. 25 लाख रोजगार निर्माण करू अशी घोषणा केली होती. प्रत्यक्षात फक्त 90 हजार रोजगार निर्मितीचे अर्थसंकल्पात नमूद केले आहे.” असे जयंत पाटील म्हणाले. तसेच, “चार चाकीचे दर वाढवून मुद्रांक शुल्कातही वाढ केली आहे. सामान्य माणसाच्या खिशातून जास्त पैसे काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. महागाई कमी करण्यासाठी सरकारने कोणतीच कार्यवाही केलेली नाही.” असे ते म्हणाले. “आम्हाला अपेक्षा होती की, शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकार जाहीर करेल, तेही झाले नाही. शेतकऱ्यांना पंतप्रधान सन्मान योजनेचे 3 हजार रुपये वाढवण्याची जी घोषणा आहे, तीही कुठे आढळली नाही. विजेचे दर कमी करण्यासाठी काही ठोस उपाययोजना दिसत नाही. राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये असमतोल तयार झालेला आहे. फक्त आश्वासनांचा हा अर्थसंकल्प आहे.” असे म्हणत त्यांनी भूमिका समोर मांडली.



Source link

Comments are closed.