मुंडे – कोकाटे यांच्या राजीनाम्यावरून गदारोळ, पहिल्याच दिवशी विरोधकांचा झंझावात, सरकार बॅकफूटवर; फडणवीस, पवार, शिंदे यांची बंद दाराआड चर्चा

महायुती सरकारमधील कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मुद्दय़ावरून विरोधक आज आक्रमक झाले. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी कोकाटे, मुंडेंच्या राजीनाम्यावरून विधान भवन डोक्यावर घेतले. ‘महाराष्ट्रात दोनच गुंडे… भ्रष्ट कोकाटे आणि मुंडे’ अशा जोरदार घोषणा देत विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधान भवनाचा परिसर दुमदुमवून सोडला. अधिवेशनातही सरकारला या प्रश्नावरून जाब विचारून विरोधकांनी सभागृह दणाणून सोडले.

बीडमधील मस्साजोगच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे, तर भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली न्यायालयाने कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

विधान परिषदेत विरोधकांचा गदारोळ

विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, कोकाटे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात बनावट कागदपत्रे सादर करून लाभ घेतला. या प्रकरणात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना शिक्षा सुनावली आहे पण ते अजूनही मंत्रीपदावर आहेत. न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले आहे. त्यांनी तात्काळ मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. दानवे यांच्या आक्रमकतेनंतर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांचा गदारोळ वाढत असल्याचे पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केला. कोकाटे यांच्याबाबत निर्णय आल्यावर दोन्ही सभागृहात तो ठेवला जाईल व सभागृहाला जो निर्णय मान्य होईल त्यावर राज्यपाल निर्णय घेतील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.

सभागृहात दोन्ही मंत्री एकाकी

मुंडे आणि कोकाटे हे दोघेही आज विधानसभा सभागृहात उपस्थित होते, परंतु मुख्यमंत्री किंवा कोणत्याही अन्य मंत्र्याने त्यांच्याशी बोलणे टाळल्याचे दिसून आले. कामकाज स्थगित झाल्यानंतर मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात जाऊन त्यांची भेट घेतली. सुमारे पंधरा-वीस मिनिटे ही भेट चालली. दोघांमध्ये काय झाले त्याचा तपशील बाहेर आला नाही, पण मुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेर पडताना मुंडेंचा चेहराही पडलेला दिसला. कोकाटे यांनीही मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतल्याने विधान भवनात चर्चा रंगली होती.

Comments are closed.