Maharashtra Congress harshvardhan sapkal selected as state congress president


मुंबई : विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या मोठ्या पराभवानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेला राजीनामा राहुल गांधी यांनी तब्बल 2 महिन्यानंतर स्वीकारला. त्यानंतर त्यांच्या जागी विदर्भातील बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची महाराष्ट्र काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. हर्षवर्धन सपकाळ हे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात. गेल्या काही दिवसांपासून नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर नवा प्रदेशाध्यक्ष कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर यावर पक्षाने शिक्कामोर्तब केले आहे. (Maharashtra Congress harshvardhan sapkal selected as state congress president)

हेही वाचा : Supreme Court : कर्जबाजारी पत्नीचे कर्ज चुकवणे ही पतीची जबाबदारी, काय म्हणाले सर्वोच्च न्यायालय 

हर्षवर्धन सपकाळ सध्या काँग्रेसच्या राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या विचारधारेवर आधारित ग्रामस्वराज्य निर्मितीत त्यांची महत्वाची भूमिका राहीली आहे. सपकाळ यांना सर्वोदय विचारांवर आधारित राष्ट्रनिर्माण युवक शिबिराचे आयोजन, ग्राम स्वच्छता अभियान आणि आदर्श ग्राम चळवळीत सक्रिय सहभागाचा अनुभव आहे. 2014 ते 2019 या दरम्यान ते बुलढाण्याचे आमदार होते. त्यांनी या काळात जलसंधारण व्यवस्थापनाचा प्रकल्प मतदारसंघात राबवला होता. दरम्यान, काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी काँग्रेसने विजय वडेट्टीवार यांची नेमणूक केली आहे. वडेट्टीवार हे 2019 मध्ये विधानसभेतील विरोधी पक्षनेते होते. 2029 मध्ये आघाडी सरकारमध्ये त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी 2023 मध्ये भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर झाल्यानंतर विरोधी पक्षनेतेपदी पुन्हा वडेट्टीवार यांची वर्णी लागली होती. अभ्यासू आणि आक्रमक आमदार अशी वडेट्टीवार यांची ओळख आहे.

असा आहे हर्षवर्धन सपकाळ यांचा अल्पपरिचय

युवावस्थेपासूनच गाडगे महाराज, तुकडोजी महाराज तसेच गांधीवादी – सर्वोदयी कार्यकर्ता म्हणून परिचित आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संलग्नित राजीव गांधी पंचायत राज संघटनचे विद्यमान अध्यक्ष आहेत. भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटनाच्या  (NSUI) माध्यमातून राजकीय जीवनात सक्रीय झाले. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून बी.कॉम आणि बी.पी.एड पदवी धारण केलेली आहे. शेतकरी कुटूंबातून आलेले असून सामाजिक कार्य तसेच राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. ग्राम स्वराज्याच्या संकल्पपूर्तीसाठी महाराष्ट्रात सुरू केलेल्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत त्यांनी विशेष योगदान दिले आहे. ग्रामस्वच्छता तथा आदर्श ग्राम निर्माण या क्षेत्रातील त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. युवकांसाठी युवक शिबिराच्या नियमित सातत्याने आयोजन, ही त्यांची वैचारिक प्रतिबध्दता दर्शविते. तसेच ही एक फार मोठी उपलब्धी समजली जाते. शेतीस्वावलंबनासाठी तसेच टंचाईमुक्तीसाठी त्यांनी आपल्या विधानसभा मतदार संघात केलेला जलवर्धन प्रकल्पाच्या माध्यमातून जलव्यवस्थापन तथा जलसंधारण क्षेत्रात त्यांनी विशेष उल्लेखनीय कार्य केले आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी तथा आदिवासी गावांचे सक्षमीकरण करण्यासाठी गेल्या 25 वर्षांपासून सातत्याने प्रयत्नशील तथा कटीबध्द आहेत. 1999 से 2002 या कालावधीत महाराष्ट्रातील सर्वात तरूण जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या कार्यकाळात बुलढाणा जिल्हा परिषद ही महाराष्ट्रात अव्वल होती, हे येथे विशेष उल्लेखनीय. तसेच 2014 ते 2019 या कालावधीत ते बुलढाणा विधान सभा मतदार संघात विधान सभा सदस्य म्हणून राहिले आहेत. अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात सद्यस्थितीत राष्ट्रीय अध्यक्ष, राजीव गांधी पंचायत राज संगठन म्हणून कार्यरत आहेत. तसेच यापूर्वी राष्ट्रीय सचिव, अ.भा.काँ.कमेटी नवी दिल्ली व राष्ट्रीय उपाध्यक्ष, राजीव गांधी पंचायत राज संगठन ही जबाबदारी सुध्दा पार पाडलेली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीवर्षाच्या निमित्ताने त्यांनी बुलढाणा विधानसभा मतदार संघात संविधान चेतना यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक गाव-वस्ती-वाडीपर्यंत संविधान जागृतीसाठी कार्य केले आहे.

काँग्रेसचे सचिव म्हणून पंजाबचे सहप्रभारी म्हणून सुध्दा काम केले आहे. तसेच तत्पूर्वी गुजरात व मध्यप्रदेश या राज्यांचे सुध्दा सहप्रभारी म्हणून जबाबदारी पार पाडलेली आहे. अ.भा.काँ. कमिटी द्वारा सेवाग्राम-वर्धा येथील गांधी आश्रमात आयोजित देशव्यापी गांधी विचार दर्शन शिबिराचे राष्ट्रीय शिबिर समन्वयक म्हणून पक्षाने सोपविलेली जबाबदारी त्यांनी यशस्वीतारित्या पार पाडलेली आहे. यासोबतच विविध राज्यातील विधान सभा निवडणूकीत उमेदवार निवडीसाठी पक्षाने स्थापित केलेल्या स्क्रिनिंग कमिटीचे सुध्दा ते सदस्य राहिलेले आहेत. एकविसाव्या शतकातील वैश्विक मित्रता अभियान अंतर्गत जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशनच्यावतीने 1996 मध्ये जपान या देशांमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय युवा परिषदेसाठी त्यांनी 20 भारतीय युवक प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केलेले आहे.



Source link

Comments are closed.