राहुल गांधींचा फोटो वापरून संभ्रम पसरवणाऱ्या पोस्ट टाका; भाजपकडून आयटी सेलला आदेश, काँग्रेसचा आरोप
राहुल गांधींचा फोटो वापरून सोशल मीडियावर जास्तीतत जास्त संभ्रम पसरवणाऱ्या पोस्ट करा असे आदेश भाजपकडून त्यांच्या आयटी सेलला देण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. महाराष्ट्र काँग्रेसने याबाबत एक पोस्ट शेअर करत भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी व इतर नेत्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट्सचा Reachness कमी झाल्याने आता भाजपने राहुल गांधींना जास्तीत जास्त लक्ष्य केले जात असल्याचे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
‘भाजपच्या अधिकृत सोशल मिडिया अकाऊंट्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या इतर नेत्यांबद्दल केलेल्या पोस्ट्स लाईक्स आणि रिचच्या बाबतीत जोरदार आपटताहेत. उलट विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पोस्ट्स ना जोरदार प्रतिसाद सोशल मिडियात मिळतोय. यामुळेच भाजपला आता लाईक्स आणि रिच मिळवण्यासाठी राहुल गांधीचे नाव आणि फोटो वापरण्याची, रोज काहीतरी मुद्दे काढून त्यांच्यावर टिका करण्याची, आंदोलने करण्याची गरज पडतेय. भाजपच्या अधिकृत सोशल मिडिया टिम्सना वरून आदेश मिळाले म्हणतात की, राहुल गांधींच्या फोटोचा जास्तीत जास्त वापर करा, राहुल गांधी यांच्यावर टिका करणाऱ्या किंवा त्यांच्याबद्दल संभ्रम पसरवणाऱ्या पोस्ट करा आणि सोशल मीडिया पेजेसचा रिच वाढवा. पण सोशल मीडिया टीमने असंबद्ध पोस्ट केल्यानंतर आता सामान्य जनताच उत्स्फूर्तपणे यांच्याच पोस्टखाली कमेंट्स मध्ये वाभाडे काढायला सुरू करते. प्रचंड पैसा खर्च करूनही सत्यासमोर भाजपची ट्रोल सिस्टिम पुर्णपणे फेल गेल्याचे दिसतेय’, अशी टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
”भाजप आणि त्यांच्या ट्रोल पिलावळीने कितीही ठरवून बदनामी करायचे प्रयत्न केले, तरी सत्य जास्त दिवस लपवून ठेवता येणार नाही, जनताच स्वयंस्फुर्तीने त्याला वाट मोकळी करून देईल. झुकलेल्या, वाकलेल्या आणि नाचलेल्या पंतप्रधानांचं सगळं सत्य, सगळे घोटाळे जनतेसमोर येणार’, असे देखील काँग्रेसने या पोस्टमध्ये म्हटले आहे.
Comments are closed.