ग्लोबल, युनिव्हर्सल अशी नावे शाळांना देण्यास मनाई, पालकांची दिशाभूल थांबणार
राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांशी संलग्न असूनही शाळांच्या नावांमध्ये इंटरनॅशनल, ग्लोबल, युनिव्हर्सल, वर्ल्ड, युरो अशी नावे वापरून ‘इंटरनॅशनल’ शाळा असल्याचे भासवण्याचे प्रयत्न करणाऱ्या शैक्षणिक संस्थांना राज्य सरकारने दणका दिला आहे. राज्य मंडळ, केंद्रीय शिक्षण मंडळाच्या शाळा (सीबीएसई) किंवा आंतरदेशीय मंडळांशी संलग्न असलेल्या शैक्षणिक संस्थांना पालकांची दिशाभूल करणारे शब्द वापरण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावरील नवीन शाळा मान्यतेचे प्रस्ताव पाठवताना शाळेच्या नावात पालक आणि विद्यार्थ्यांची दिशाभूल करणारे शब्द वापरत असल्याचे शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये नावावरून निर्माण होणारा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
सैनिकी शाळा म्हणून मान्यताप्राप्त शाळांनाच शाळेच्या नावात ‘सैनिकी’ शब्दाचा वापर करता येईल. संस्थांना ज्या शैक्षणिक मंडळाशी संलग्न होण्यासाठी शाळा स्थापन करायची आहे अशा शैक्षणिक मंडळाचा उल्लेख शाळेच्या नावात करता येईल, असे आदेश शालेय शिक्षण विभागाने जारी केले आहेत.
मात्र आय.बी. केम्ब्रिज, आय.जी.सी.एस. अशा आंतरराष्ट्रीय मंडळांशी संलग्न असलेल्या किंवा या मंडळांशी संलग्न होण्यास इच्छुक असलेल्या शाळांनाच केवळ या शब्दांचा वापर करता येईल, असे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. या विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला, परंतु हा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार नाही. यापुढे नव्याने स्थापन होणाऱ्या शाळांनाच हा निर्णय लागू राहील.
त्या शाळांना ‘कॉन्व्हेंट’ म्हणता येणार नाही
ख्रिस्ती धर्मसंघ, ख्रिश्चन नन्स समुदायाद्वारे संचलित करण्यात येणाऱ्या शाळांच्या नावामध्ये ‘कॉन्व्हेंट’ शब्द वापरता येईल. मात्र अन्य संस्था, न्यास किंवा कंपन्यांद्वारे स्थापित करण्यात येणाऱया शाळांना शाळेच्या नावात ‘कॉन्व्हेंट’ या शब्दाचा वापर करता येणार नाही, असे विभागाने म्हटले आहे.
Comments are closed.