Maharashtra Crime Congress Vijay Wadettiwar criticized State government asj


मुंबई : गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यातील अनेक हत्या आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटना प्रकाशझोतात आल्या. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी पाहायला मिळाल्या. सध्या राज्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या हत्या सत्रांमुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. अशामध्ये काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. “राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असून जाग येण्यासाठी आणखी किती वाट पाहणार आहात? असा सवाल त्यांनी यावेळी राज्य सरकारला केला आहे. (Maharashtra Crime Congress Vijay Wadettiwar criticized State government)

हेही वाचा : Dhananjay Munde : संतोष देशमुख हत्या प्रकरणावर धनंजय मुंडे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गुन्हेगार माझ्या जवळचा असला, तरी…” 

– Advertisement –

कल्याणमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. पुण्यामध्येही दोन बहिणींची हत्या करण्यात आली. तर, पुणे शहरात भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. यामुळे विरोधकांकडून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यावरून काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी ट्विट केले की, “बदलापूर…आता कल्याण, पुणे! जाग येण्यासाठी सरकार आणखी किती घटनांची वाट बघत आहे? कल्याण येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. आरोपी विशाल गवळीवर यापूर्वीही अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद असताना तो जामिनावर सुटला आणि पुन्हा एका लहान मुलीवर अत्याचार करून तिचा जीव घेतला. हे अत्यंत संतापजनक आहे. यावरून राज्यातील पोलीस आणि कायदा यांचा गुन्हेगारांवर धाक उरला नसल्याचे स्पष्ट होते,” असा थेट आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.

“बदलापूर असो किंवा कल्याण, महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर महायुती सरकार किती गंभीर आहे? हे या घटनांमधून स्पष्ट होते. राजगुरुनगर, पुणे येथे दोन बहिणींची हत्या हादेखील संतापजनक प्रकार आहे. खेळता खेळता हरवलेल्या या मुलींच्या निर्घृण हत्येमुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचे स्पष्ट होत आहे. गुन्हेगार निर्भयपणे वावरत असून हे सरकारच्या अपयशाचे लक्षण आहे,” अशी घणाघाती टीका वडेट्टीवार यांनी केली आहे. “या दोन्ही घटनांमधील गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी. राज्यात महिला आणि मुली निर्भयपणे फिरू शकत नाही. इथे गुंड, बलात्कारी निर्धास्तपणे फिरत आहेत. राज्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असून महायुती सरकारला जबाबदारी स्वीकारावी लागेल. या दोन्ही घटनांतील गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी पोलीस आणि न्यायव्यवस्थेने ठोस पावले उचलावी,” अशी मागणीदेखील त्यांनी यावेळी केली.


Edited by Abhijeet Jadhav



Source link

Comments are closed.