तायक्वांदोमध्ये पदक सप्तमी! मिश्र दुहेरी सुवर्णांसह 2 रौप्य, 4 कांस्य

38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा हल्दवानी : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने तायक्वांदोमध्ये मिश्र दुहेरी सुवर्णांसह  2 रौप्य, 4 कांस्य पदकांची कमाई करीत दिवस गाजविला. वंश ठाकुर व मृनाली हर्नेकर जोडीने सुवर्ण पदकाला गवसणी घातली, स्पर्धेत दोघाचं सलग दुसरे पदक आहे. वैयक्तिक प्रकारात मृनालीने रौप्य, तर वंश पदक जिंकले आहे.

मानसखंड क्रीडा संकुलात सुरू असलेल्या स्पर्धेत शिवानी भिलारेने रौप्य, तर साक्षी पाटील, अभिजीत खोपडे, वसुधरा छेडे यांनीही कांस्य पदकांची लयलूट केली. मिश्र पूमसे प्रकारात वंश ठाकुर सोबत मृनाली हर्नेकरने अरूणाचल प्रदेशच्या जोडीवर रोमहर्षक मात केली. महाराष्ट्राने 8.233 गुणांची मजल घेत सुवर्णपदकावर नाव कोरले. वैयक्तिक पूमसे प्रकारात मृनाली हर्नेकरने रूपेरी यश संपादन केले. अरूणाचल प्रदेश विरूध्द महाराष्ट्राची लढत 8.232 गुणांवर बरोबरीत झाली. मात्र अरूणाचलने प्रभावी प्रदर्शन केल्याने पाईंंट 1 गुणांनी महाराष्ट्राचा निसटता पराभव झाला.

57 किलो गटातील उत्तराखंडच्या पूजा कुमारी या स्थानिक खेळाडूला स्थानिक प्रेक्षकांचा सातत्याने प्रोत्साहन मिळत होते. तरीही महाराष्ट्राच्या शिवानी भिलारे हिने शेवटपर्यंत कौतुकास्पद लढत दिली. अखेर शिवानीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. शिवानी व पूजा यांच्यातील 57 किलो गटाची लढत अतिशय रंगतदार झाली. दोन्ही खेळाडूंनी आपले सर्वस्व पणाला लावून ही लढत खेळली. त्यामुळेच शेवटपर्यंत त्यामध्ये उत्सुकता राहिली होती. त्यातही या लढतीच्या पहिल्या मिनिटापासून शेवटपर्यंत पूजा हिला स्थानिक प्रेक्षकांकडून सतत प्रोत्साहन मिळाले. तरीही शिवानी हिने जिद्दीने झुंज दिली.अखेर पूजा हिला सुवर्णपदक तर शिवानीला रौप्यपदक मिळाले.

वजनी गटात साक्षी पाटील (48 किलो ) व अभिजीत खोपडे (54 किलो) तर  वैयक्तिक पूमसे प्रकारात वंश ठाकुर  व  वसुधरा छेडे  या चौघांनीही उपांत्य फेरीपर्यंत मजल गाठताना सातत्यपूर्ण कामगिरी केली होती. उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर त्यांना कांस्यपदक बहाल करण्यात आले.

Comments are closed.