आखातातील युद्धामुळे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर मोठं संकट! आदित्य ठाकरें यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची मागणी
मध्य पूर्व आणि पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आगामी काळात महाराष्ट्राला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो, अशी चिंता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला संबोधित करावे आणि राज्याची आर्थिक वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी आग्रही मागणी आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे.
आदित्य ठाकरे यांनी एक्सच्या माध्यमातून राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या तीन मुख्य स्तंभांवर होणाऱ्या संभाव्य परिणामांकडे लक्ष वेधले आहे. त्यांच्या मते, महाराष्ट्राच्या प्रगतीचे इंजिन मानल्या जाणाऱ्या सेवा क्षेत्राला जागतिक अस्थिरतेचा फटका बसण्यास आधीच सुरुवात झाली आहे. तसेच, उत्पादन क्षेत्राच्या वाढीचा वेग मंदावल्याचे संकेत मिळत असतानाच, आता इंधनाच्या, विशेषतः गॅसच्या वापराचे प्राधान्यक्रम बदलल्यास या क्षेत्राला मोठी झळ सोसावी लागेल. दुसरीकडे, आधीच संकटात असलेल्या शेती क्षेत्रावर बियाणे, खते यांसारख्या निविष्ठांच्या उपलब्धतेपासून ते उत्पादित मालाच्या विक्रीपर्यंत सर्वच स्तरांवर विपरित परिणाम होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
मी नम्रपणे विनंती करतो की @CMOMaharashtra मध्यपूर्व/पश्चिम आशियातील युद्धामुळे महाराष्ट्राला ज्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे किंवा त्याला तोंड द्यावे लागणार आहे, त्याबद्दल राज्य विधानसभेच्या माध्यमातून नागरिकांना संबोधित करणे.
राज्याला अडचणींचा सामना करावा लागेल हे आपणा सर्वांना माहीत आहे, पण ही मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) १२ मार्च २०२६
हे राजकारण नसून सज्जतेची वेळ असल्याचे स्पष्ट करत आदित्य ठाकरे यांनी सरकारला गांभीर्याने पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेची व्याप्ती मोठी असल्याने मुख्यमंत्र्यांनी स्वतः समोर येऊन सद्यस्थिती मान्य करावी आणि भविष्यातील उपाययोजनांबाबत स्पष्टता द्यावी, असे त्यांनी म्हटले आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता अधिकृत माहितीच्या आधारे निर्णय घ्यावेत, यासाठी मुख्यमंत्र्यांनी राज्याला या संकटासाठी तयार करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
Comments are closed.