महाराष्ट्रात 2.19 लाख आर्थिक घोटाळे, मुंबईत सर्वाधिक 38 हजार कोटी रुपयांचा चुना

महाराष्ट्रात गेल्या वर्षी 2.19 लाख आर्थिक घोटाळ्यांची नोंद झाली असून मुंबई अव्वल स्थानावर आहे. राज्य गृह विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 2024 मध्ये राज्यात एकूण 2,19,047 आर्थिक फसवणुकीची प्रकरणे नोंदवली गेली. एकूण 38,872.14 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून सर्वाधिक प्रकरणे मुंबईतील आहेत.

मुंबईत सर्वाधिक 51,873 आर्थिक फसवणुकीची प्रकरणे नोंदवली गेली, ज्यात एकूण 12,404.12 कोटी रुपयांचा घोटाळा झाला. मुंबईपाठोपाठ पुणे शहराचा क्रमांक लागत असून, तेथे 22,059 फसवणुकीची प्रकरणे नोंद झाली ज्यात 5,122.66 कोटी रुपयांना चुना लागला आहे.

संपूर्ण पुणे जिल्ह्यात 42,802 आर्थिक फसवणुकीची प्रकरणे नोंदवली गेली. यात पिंपरी-चिंचवडमध्ये 16,115 (3,291.25 कोटी रुपये) तर ग्रामीणमध्ये 4,628 (434.35 कोटी रुपये) प्रकरणांची नोंद झाली.

ठाणे जिल्ह्यात 35,388 फसवणुकीची प्रकरणे नोंदवली गेली. यापैकी ठाणे शहरात 20 हजार 892, नवी मुंबईत 13 हजार 260 आणि ठाणे ग्रामीणमध्ये 1 हजार 236 प्रकरणे नोंदली गेली. आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील एकूण 8,583.61 कोटी रुपये आर्थिक घोटाळा झाला.

मीरा भाईंदर आणि वसई विरार भागात 11,754 (1,431.18 कोटी रुपयांचे नुकसान),
नागपूर शहरात 11,875 प्रकरणे तर नागपूर ग्रामीणमध्ये 1,620 प्रकरणे नोंदवली गेली असून यात एकूण 1,491.07 कोटी रुपयांचे नुकसान झाले.

नाशिक जिल्ह्यात 9,169 प्रकरणे नोंदवली गेली असून यापैकी नाशिक शहरात 6,381 आणि नाशिक ग्रामीणमध्ये 2,788 प्रकरणे समाविष्ट आहेत. जिल्ह्यात एकूण 1,047.32 कोटी रुपयांचे नुकसान झाले.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 543.61 कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीची 6,090 प्रकरणे नोंदवली गेली, तर अमरावती जिल्ह्यात 223.059 कोटी रुपयांच्या 2,778 प्रकरणे नोंद झाली. छत्रपती संभाजीनगर शहरात 4,837 आणि अमरावती शहरात 1,819 प्रकरणे नोंदली गेली. सोलापूर जिल्ह्यात 3,457 फसवणुकीची प्रकरणे (394.54 कोटी रुपये नुकसान) नोंद झाली.

अन्य जिल्ह्यांमध्ये, बुलढाण्यात 1,531, चंद्रपूरमध्ये 1,792 आणि लातूरमध्ये 1,624 प्रकरणे नोंदवण्यात आली. यात अनुक्रमे 239.19 कोटी, 175.39 कोटी आणि 240.45 कोटी रुपयांचा समावेश आहे.

Comments are closed.