चुकून हिंदुस्थानची हद्द ओलांडली… सातपाटीचा मच्छीमार पाकिस्तानात

गुजरातमधील नल नारायण बोटीवर मच्छिमारीसाठी खोल समुद्रात गेलेला सातपाटीचा मच्छीमार पाकिस्तानी सैनिकांच्या ताब्यात सापडला आहे. नामदेव मेहेर (६५) असे या खलाशाचे नाव असून त्यांच्याबरोबर अन्य आठ मच्छीमारही पाकड्यांच्या तावडीत सापडले आहेत. मच्छिमारी सुरू असतानाच या बोटींनी चुकून हिंदुस्थानची हद्द ओलांडली. त्याच वेळी पाकिस्तानी मेरीटाईम सिक्युरिटी एजन्सीने या खलाशांना ताब्यात घेतले.

पालघर जिल्ह्यातील सातपाटी, डहाणू तसेच तलासरी तालुक्यातील अनेक मच्छीमार चांगले पैसे मिळत असल्याने गुजरातच्या ओखा, पोरबंदर व वेरावल परिसरातील बोटींवर खलाशी म्हणून काम करतात. मात्र मासेमारी करताना काही बोटी चुकून अनेकदा पाकिस्तानी हद्दीत जातात. नल नारायण तसेच अन्य दोन बोटीदेखील अशाच चुकून पाकिस्तानी हद्दीत गेल्या. हा प्रकार पाकिस्तानी गस्ती नौकांवरील सैनिकांच्या लक्षात येताच त्यांनी या बोटींना घेराव घालत खलाशांना ताब्यात घेतले. यामध्ये सातपाटी येथील मच्छीमार नामदेव मेहेर यांचादेखील समावेश आहे.

आजही 193 मच्छीमार पाकिस्तानी तुरुंगात

गुजरात राज्यातील जलपरी बोटीवर पाकिस्तान सैनिकांनी केलेल्या गोळीबारात पालघरच्या वडराई गावातील श्रीधर चामरे (३२) यांचा मृत्यू झाला होता. या मृत श्रीधर यांचे नामदेव मेहेर हे सासरे आहेत. वयाची ६५ वर्षे पूर्ण केल्याने त्यांची ही मच्छिमारीची शेवटची ट्रीप होती, अशी माहिती त्यांचा मुलगा कांचन यांनी दिली. दरम्यान, आजही १९३ मच्छीमार पाकिस्तानी तुरुंगात असून त्यांच्या सुटकेसाठी कुटुंबीय धडपडत असल्याची माहिती इंडिया-पाकिस्तान पिपल्स फोरम फॉर पीस अॅण्ड डेमोक्रेसी संस्थेचे माजी पदाधिकारी जतीन देसाई यांनी दिली

Comments are closed.