महाराष्ट्राचे सलग बारावे जेतेपद, ओडिशाचा धुव्वा; राज्याच्या मुलींचा ज्यु. राष्ट्रीय खो-खोत दबदबा
वेगवान आक्रमण, अभेद्य बचाव आणि कल्पक खेळाच्या जोरावर महाराष्ट्राच्या मुलींनी 45 व्या ज्युनियर राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत सुवर्णसिंहासनावर आपला दबदबा कायम राखला. अंतिम लढतीत ओडिशाला 27-19 अशा आठ गुणांनी चीतपट करत महाराष्ट्राने 27 वे राष्ट्रीय विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे सलग 12 व्या विजेतेपदाचा विक्रमी ‘डझन’ पूर्ण करत महाराष्ट्राने प्रतिस्पर्ध्यांना पुन्हा आपली ताकद दाखवून दिली
नाणेफेक जिंकून ओडिशाने संरक्षण स्वीकारले, मात्र महाराष्ट्राच्या वादळी आक्रमणापुढे त्यांचा टिकाव लागला नाही. पहिल्या डावात 12 गुण आणि तीन बोनससह महाराष्ट्राने 15 गुणांची कमाई केली. प्रत्युत्तरात ओडिशाला अवघ्या सहा गुणांवर रोखत महाराष्ट्राने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली.
दुसऱया डावातही महाराष्ट्राने आक्रमणाची धार कायम ठेवली. 10 गुणांची भर घालत विजयाची पकड अधिक घट्ट केली. ओडिशानेही 10 गुण मिळवत झुंज दिली, मात्र पहिल्या डावातील पिछाडी त्यांना भरून काढता आली नाही. अखेर 27-19 असा दणदणीत विजय मिळवत महाराष्ट्राने सुवर्णपदकावर नाव कोरले. महाराष्ट्राच्या विजयात स्नेहा लामकाने (6 गुण), मैथिली पवार (6 गुण), धनश्री कंक (4 गुण) आणि प्रणिती जगदाळे (4 गुण) यांनी आक्रमणात गुणांचा धडाका लावला.
मुलींचा वर्चस्व अभिमानास्पद
महाराष्ट्राच्या मुलींनी ओडिशाविरुद्ध आक्रमण आणि संरक्षण अशा दोन्ही आघाडय़ांवर खेळाडूंनी अफलातून कामगिरी केली. सलग 12 वे आणि एकूण 27 वे राष्ट्रीय विजेतेपद पटकावणे ही महाराष्ट्राच्या खो-खो इतिहासातील अभिमानास्पद कामगिरी आहे. आगामी स्पर्धांमध्येही महाराष्ट्राच्या मुली विजयी घोडदौड कायम ठेवतील, असा विश्वास राज्य संघटनेचे सरचिटणीस प्रा. चंद्रजीत जाधव यांनी बोलून दाखविला.
Comments are closed.