आयटीआयमध्ये पौरोहित्याचे धडे! अंमलबजावणीआधीच निर्णय वादात पुरोहित संघटनांकडून विरोध

राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्येही धार्मिक गोष्टी घुसवण्याचा प्रयत्न महायुती सरकारकडून होत आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) पौरोहित्याचे धडे देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आयटीआयमध्ये ‘वैदिक संस्कार ज्युनिअर असिस्टंट’ हा नवा अल्पमुदतीचा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय कौशल्य विकास विभागाने घेतला आहे. मात्र हा निर्णय अंमलबजावणीआधीच वादाच्या भोवऱयात सापडला आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर विश्वस्त मंडळासह विविध पुरोहित संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या अभ्यासक्रमाला तीव्र विरोध दर्शवला आहे.
राज्यातील तीर्थक्षेत्रांमध्ये प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हावे या हेतूने हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला आहे. 2026-27 मध्ये नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याची पार्श्वभूमी त्याला जोडली जात आहे. या उपक्रमांतर्गत युवकांना धार्मिक मेळ्यांमध्ये, यात्रांमध्ये आणि तीर्थक्षेत्रांवर कार्य करण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. या अभ्यासक्रमाला राष्ट्रीय कौशल्य पात्रता आराखडय़ाची (एनएसक्यूएफ) मान्यता मिळाली आहे. हा अभ्यासक्रम 3 ते 6 महिन्यांचा आहे आणि यामार्फत कुंभमेळ्यातील लाखो भाविकांना शिस्तबद्ध व्यवस्थापन आणि सेवा पुरवण्याचे उद्दिष्ट आहे. नाशिकसह देशभरातील तीर्थक्षेत्रांवर अशा प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज असल्याचे काwशल्य विकास विभागाचे म्हणणे आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिर विश्वस्त मंडळाचा तीव्र विरोध
त्र्यंबकेश्वर मंदिर विश्वस्त मंडळाने या अभ्यासक्रमाला तीव्र आक्षेप घेतला आहे. वैदिक संस्कारांचे शिक्षण हे गुरुकुल पद्धतीने किंवा परंपरागत पद्धतीने दिले जावे, कारण यामध्ये धार्मिक आणि आध्यात्मिक मूल्यांचा समावेश आहे, जो आयटीआयसारख्या व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेच्या कार्यक्षेत्रात बसत नाही, असे मंडळाचे म्हणणे आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर विश्वस्त मंडळाचे विश्वस्त ललित गायकर यांनी सांगितले की, वैदिक संस्कारांचे शिक्षण हे धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्टय़ा संवेदनशील आहे. यासाठी खास प्रशिक्षित गुरू आणि परंपरागत पद्धतींची गरज आहे. आयटीआयच्या अभ्यासक्रमातून याची पवित्रता आणि खरे स्वरूप टिकणार नाही. कौशल्य विकास व रोजगार विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या अभ्यासक्रमाचे समर्थन केले आहे.
- पुरोहित संघटनांनी हा अभ्यासक्रम वैदिक परंपरांचा अवमान करणारा असल्याचा आरोप केला आहे. पुरोहित संघाचे केशवराव गाडगीळ यांनी सांगितले की, वैदिक संस्कारांचे प्रशिक्षण हे केवळ व्यावसायिक कौशल्य म्हणून शिकवले जाऊ शकत नाही. यामुळे धार्मिक परंपरांचे पावित्र्य कमी होऊ शकते आणि अशा अभ्यासक्रमामुळे तीर्थक्षेत्रांवरील पारंपरिक पुरोहितांचे महत्त्व कमी होण्याची भीती आहे. या निर्णयाचा फेरविचार करण्यात यावा असे पुरोहित संघटनांचे मत आहे.
Comments are closed.