राज्यात IAS अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या; CIDCOचे उपाध्यक्षांकडे धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी OSD पदाची जबाबदारी

राज्य शासनाने भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या आणि नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या बदल्यांमध्ये धारावी पुनर्विकास प्रकल्प, CIDCO, MMRDA, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC), बृहन्मुंबई महानगरपालिका तसेच जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या पदांचा समावेश आहे.

शासनाने जारी केलेल्या आदेशानुसार, विजय सिंघल यांची CIDCOच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदावरून बदली करून त्यांची धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी विशेष कर्तव्य अधिकारी (OSD) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्राजक्ता वर्मा यांची बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पी. वेलरासू यांच्याकडे आता महसूल व वन विभागातील सचिव (वन) पदाची जबाबदारी सोपविण्यात आली असून, डॉ. अश्विनी जोशी यांची MMRDAच्या अतिरिक्त महानगर आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दीपेंद्र सिंह कुशवाह यांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (MIDC) मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

तसेच अश्विन मुदगल यांची CIDCOच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी (VCMD) नियुक्ती झाली आहे. डॉ. कादंबरी बलकवडे यांना विकास आयुक्त (उद्योग) पदाची जबाबदारी देण्यात आली आहे, तर संजय काटकर यांची आयुक्त (कुटुंब कल्याण) आणि संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यातील जिल्हा परिषदांमध्येही महत्त्वाच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. जेनिथ चंद्रा डोनथुला यांची जिल्हा परिषद गोंदियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तर अनय नावंदर यांची जिल्हा परिषद अकोलाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

याशिवाय डॉ. बी. सरावनन यांना किनवट (नांदेड) येथील ITDP प्रकल्प अधिकारी व सहायक जिल्हाधिकारी, तर लघिमा तिवारी यांना तळोदा (नंदुरबार) येथील ITDP प्रकल्प अधिकारी व सहायक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

Comments are closed.