सचिन तेंडुलकरच्या आवाहनाला क्रीडामंत्री कोकाटे यांचा सकारात्मक प्रतिसाद; महिलांसाठी ऐतिहासिक निर्णय

राज्यातील महिला खेळाडूंसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेत महाराष्ट्र शासनाने महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्यातील सर्व क्रीडा संकुल, स्पोर्ट्स क्लब, जिमखाना, स्टेडियम तसेच स्थानिक क्रीडांगणांवर महिला खेळाडूंना स्वतंत्र, स्वच्छ, सुरक्षित आणि सुसज्ज चेंजिंग रूमची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी जाहीर केला आहे.

या निर्णयामुळे राज्यभरातील महिला खेळाडूंना सन्मानजनक आणि सुरक्षित वातावरणात खेळण्याची संधी मिळणार आहे. प्रत्येक जिल्हा, तालुका आणि स्थानिक पातळीवरील क्रीडांगणांवर या सुविधा प्राधान्याने उभारल्या जाणार असून, त्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

या चेंजिंग रूम्समध्ये स्वच्छतागृह, आरोग्य सुविधा, तसेच आवश्यक सुरक्षिततेसाठी मर्यादित क्षेत्रात सीसीटीव्ही यंत्रणा उभारली जाणार आहे. याशिवाय, महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्तीही केली जाणार आहे. जुन्या इमारतींचे नुतनीकरण किंवा नव्याने चेंजिंग रूम्स बांधण्याच्या कामांना लवकरच सुरुवात होणार आहे.

हा निर्णय भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या अलीकडील सूचनेवर आधारित असून, त्याने छत्रपती शिवाजी पार्क जिमखान्याच्या उद्घाटनप्रसंगी महिलांना सुरक्षित आणि आदरयुक्त क्रीडावातावरणाची गरज व्यक्त केली होती. त्यांच्या या आवाहनाचा तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

क्रीडा मंत्री कोकाटे म्हणाले की, “क्रीडा क्षेत्रातील प्रत्येक मुलगी आता भीतीने नव्हे, तर अभिमानाने मैदानात उतरेल. तिच्या यशामागे सुरक्षित आणि सन्मानित वातावरणाचा मजबूत पाया असेल.” या निर्णयामुळे राज्यातील महिला खेळाडूंसाठी नव्या पर्वाची सुरुवात होणार असून, केंद्र शासनाच्या ‘बेटी बचाओ, बेटी को खिलाओ’ या मोहिमेलाही या माध्यमातून गती मिळणार आहे

Comments are closed.