अमित शहा म्हणतात… महाराष्ट्र सर्वांत मोठे बहुभाषिक राज्य !

‘महाराष्ट्राच्या भूमीवर हिंदी, कोकणी, गुजराती, सिंधी, कन्नड, वारली अशा अनेक भाषांचा विकास झाला आणि सन्मान करण्यात आला आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वांत मोठे बहुभाषिक राज्य आहे,’ अशी भूमिका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज मांडली.

वाशी येथे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागाच्या वतीने आयोजित ‘हिंदी दिवस-२०२६’ आणि सहाव्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचे उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आदी उपस्थित होते.

शहा म्हणाले, ‘महाराष्ट्राच्या शासनव्यवस्थेत सर्व भाषांना स्वीकारण्याची आणि सन्मान देण्याची दृष्टी ठेवली आहे. महाराष्ट्रापेक्षा मोठे बहुभाषिक राज्य संपूर्ण देशात दुसरे नाही. राजभाषा संमेलन केवळ राजधानी दिल्लीपुरते मर्यादित न ठेवता, देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये नेण्याचा केंद्र सरकारचा निर्णय यशस्वी ठरला असून, हे सहावे संमेलन महाराष्ट्रात होत आहे.’

प्रादेशिक भाषा कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे, तर हिंदीला मध्यमणी बनवूया !

‘देशातील सर्व प्रादेशिक भाषा या कमळाच्या विविध पाकळ्यांप्रमाणे सुंदर 1 आहेत. या सर्व समृद्ध भाषांचा आदर राखत हिंदीला त्यांच्यामध्ये समन्वय साधणारा मध्यमणी बनवूया,’ असे आवाहनही अमित शहा यांनी केले.

माझी आई मराठी, इतर भाषा मावशीसारख्या – मुख्यमंत्री

‘माझी आई मराठी आहे. मात्र, देशातील इतर सर्व भाषा माझ्या मावशीसारख्या आहेत. आईचा गौरव करतानाच मावशीचाही पूर्ण सन्मान राखला पाहिजे,’ असे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Comments are closed.