अखेर आरोग्य विभागाला जाग आली! राज्यात सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ घोषित

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

गडचिरोली जिल्ह्यातील धानोर तालुक्यातील आश्रमशाळेत झोपेत असताना सर्पदंश झाल्यामुळे तीन विद्यार्थीनींचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे राज्यभरात संतापाची लाट पसरली. अशा अनेक घटना आजही ग्रामीण भागांमध्ये मोठ्या प्रमाणत घडत आहेत. सर्पदंशामुळे अनेकांचे मृत्यू झाले आहेत, तर अनेकांना अपंगत्वाचा सामना करावा लागला आहे. या सर्व घटनांचा विचार करता सार्वजनिक आरोग्य विभागाने एक महत्त्वाच निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, सर्पदंशाला आता ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित करण्यात आले असून, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतलेल्या या निर्णयानुसार राज्यातील सर्व शासकीय व खासगी रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये आणि डॉक्टरांना सर्पदंशाच्या प्रत्येक संशयित किंवा निश्चित घटनेची तसेच मृत्यूची नोंद आरोग्य प्राधिकरणाकडे करणे बंधनकारक असणार आहे. त्याचबरोबर आरोग्य संस्थांना त्यांच्याकडे येणाऱ्या सर्पदंशाच्या प्रत्येक रुग्णाची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक किंवा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना देणे बंधनकारक असेल. ही सर्व माहिती HMIS/DHIS-2 किंवा IDSP प्रणालीद्वारे डिजिटल पद्धतीने नोंदवली जाईल. यात रुग्णाला दिलेली ASV (अँटी स्नेक व्हेनम) लसीची मात्रा, उपचाराचा परिणाम आणि इतर तपशील समाविष्ट असतील. तसेच, सर्पदंशाच्या प्रतिबंध व नियंत्रणासाठी राज्य, जिल्हा व महानगरपालिका स्तरावर ‘नोडल अधिकाऱ्यांची’ नियुक्ती करण्यात आली असून, ते संपूर्ण प्रक्रियेवर थेट लक्ष ठेवणार आहेत.

उपचार करणाऱ्या प्रत्येक रुग्णालयाला एएसव्ही लसीच्या साठ्याची आणि वापराची अद्ययावत नोंद ठेवावी लागणार आहे, जेणेकरून जास्त धोका असलेल्या भागात लसीचा तुटवडा भासणार नाही. या डेटाच्या आधारे सर्पदंशाच्या घटना, हंगाम व इतर घटकांचा अभ्यास करून स्थानिक पातळीवर जनजागृती मोहीम राबवली जाईल. “वेळेवर उपचार हाच जीव वाचविण्याचा मंत्र” असल्याचे सांगत शासनाने या मोहिमेद्वारे जास्तीत जास्त अनमोल जीव वाचवण्याचे आवाहन केले आहे.

Comments are closed.