महाराष्ट्राचे प्रश्न वेगळे… औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून अजित पवार गटाने भाजप, विहिंप, बजरंग दलाला केलं लक्ष्य

सध्या महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीवरून राजकीय वादंग मुद्दामहून उठवले जात आहे. औरंगजेबाची किंवा अफजलखानाची कबर हे आपल्या गौरवशाली इतिहासातील शौर्याचे पान आहे. त्यामुळे या कबर हटवण्याची मागणी करणे, ही इतिहासाची प्रतारणा ठरले. तसेच हा मुद्दा केंद्र सरकारच्या अखत्यारीतील असून सध्या राज्यासमोर अनेक मोठे प्रश्न आहेत. त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे मत अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केले आहे. या मुद्द्यावरून त्यांनी भाजप, विहिंप, बजरंग दलावर निशाणा साधला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती महाराणी ताराबाई यांनी औरंगजेबाशी संघर्ष केला. हिंदवी स्वराज्य नष्ट करण्याचे त्याचे स्वप्न धुळीस मिळाले आणि महाराष्ट्रातल्या मातीतच त्याला गाडण्यात आले. हे आपल्या इतिहासाचा शौर्याचा इतिहास आहे. आपल्या पुढील पिढीला आपल्या शौर्याच्या इतिहासाची माहिती होण्यासाठी हे महत्त्वाचे प्रतीक आहे. या कबरींचे उदात्तीकरण करण्यात येऊ नये. मात्र, त्या हटवण्याची मागणी अयोग्य असल्याचेही मिटकरी यांनी स्पष्ट केले.

काहीजणांनी 23 मार्चपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. त्यांनी राज्यातले प्रश्न काय आहेत, त्याकडे लक्ष द्यावे. कांदा, सोयबीन, कपाशी उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न बिकट झाले आहेत. एका शिक्षकाने 18 वर्षे पगार मिळत नसल्याने आत्महत्या केली आहे. बुलढाण्यातील शेतकऱ्याने तीन पानी पत्र लिहीत जीवन संपवले आहे. महाराष्ट्राचे हे प्रश्न महत्त्वाचे आहे. औरंगजेबाची, अफजलखानाची कबर हे प्रश्न केंद्र सरकारच्या अखत्यारीतील आहेत. महाराष्ट्राचे प्रश्न वेगळे आहेत, याची जाणीव ठेवण्याची गरज आहे. राज्यातील प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होण्यासाठी काहीजण मुद्दाम असे प्रश्न उपस्थित करत असल्याचे मिटकरी म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लीम नव्हते, असे म्हणणाऱ्यांनी इतिहास वाचण्याची आणि त्याचा अभ्यास करण्याची गरज आहे. भातखळकर आणि नितेश राणे कोणत्याही अभ्यासाशिवाय अशी वक्तव्ये करत स्वतःचेच हसे करून घेत आहे. त्यांनी इतिहासाचा अभ्यास करावा, असा सल्लाही मिटकरी यांनी दिला आहे.

Comments are closed.