Maharashtra Kesari – महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा फिक्स होती, स्पर्धेत ‘मोहोळ’ का उठले? जितेंद्र आव्हाड यांची टीका

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा फिक्स होती असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला तसेच रागाच्या भरातशिवराज राक्षेने पंचांसोबत केलं तेच जर सिकंदर शेख याने केलं असतं. तर त्याच्या आई बहीणीची इज्जत रस्त्यावर निघाली असती असेही आव्हाड म्हणाले.

एक्सवर या कुस्तीचा व्हिडीओ पोस्ट करून आव्हाड म्हणाले की, काल महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीचा सामना झाला अन् आश्चर्यकारक निकाल लागला. या उपांत्य फेरीच्या लढतीचा व्हिडिओ मी खाली टाकला आहे. हा व्हिडिओ कुणीही बघू शकतो. शिवराज राक्षेची पाठ जमिनीला लागलीच नाही; त्याची कूस जमिनीवर लागली. शिवराजची कूस जमिनीला लागल्यावर पृथ्वीराज मोहोळ कुस्ती जिंकला, असे जाहीर करण्यात आले. कूस लागल्यावर प्रतिस्पर्धी जिंकत नसतो, हे सांगण्यासाठी कोणा कुस्तीतज्ज्ञाची गरज नाही. कारण, मातीला पाठ लागली तरच चितपट घोषित केले जाते. ही तर मॅटवरची कुस्ती आहे, त्यामुळे सगळेच स्पष्ट दिसतेय. सध्याच्या टीव्ही कॅमेरांमुळे तर अधिकच स्पष्टता येते. म्हणूनच ही कुस्ती फिक्स होती… मॅच फिक्सिंग होती, हे उभ्या महाराष्ट्राला कळले आहे. कुस्तीत हे कुठलं राजकारण शिरलंय. जे खरोखरच ताकदीचे आणि मेहनतीने पुढे आलेले पैलवान आहेत; त्यांना राजकारण करून मागे ढकलण्याचे काम सिकंदर शेखपासून सुरू झाले आहे असे आव्हाड म्हणाले.

तसेच आज मला एका गोष्टीचा प्रकर्षाने उल्लेख करावासा वाटतो, जो प्रकार रागावून, अन्याय झाल्याने शिवराज राक्षेने पंचांसोबत केला. तोच जर सिकंदर शेखने केला असता तर आतापर्यंत सिकंदर शेखच्या अख्ख्या खानदानाची, त्याच्या आई- बहिणीची लाज रस्त्यावर निघाली असती. टोलधाडीने त्याला छळ … छळ छळला असता. पण, त्याने शांतपणे अन्याय सहन केला आणि परत अन्यायावर मात करून महाराष्ट्र केसरी किताब जिंकला असेही आव्हाड यांनी सांगितले.
असो,पण या कुस्तीमध्ये खरा जिंकला तो शिवराज राक्षेच ! ठरवून पृथ्वीराज मोहोळ याला जिंकविण्यात आले. अंतिम फेरीतही महेंद्र गायकवाड यानेही पंचांच्या पक्षपाती धोरणाचा निषेध करीत मैदान सोडले. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या दुधात विरजण कोण घालतंय? एवढं “मोहोळ” का उठले? कारण… राजकारण !! असेही आव्हाड यांनी नमूद केले.

Comments are closed.