भाजप सरकारकडून बळीराजाची क्रूर थट्टा; नुकसानभरपाई म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यात टाकले तीन, पाच, आठ आणि 21 रुपये!

अतिवृष्टीने शेतकऱयांची घरेदारे उद्ध्वस्त झाली. पीक तर वाहून गेलेच, पण अनेक शेतकऱयांच्या शेतातील मातीसुद्धा खरडून वाहून गेली. महायुती सरकारने त्यांना 31 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. दिवाळीपूर्वी शेतकऱयांच्या खात्यात पैसे जमा होतील असे आश्वासन दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. ते जमा न झाल्याने शेतकऱयांची दिवाळी अंधारात गेली. आता त्यापेक्षाही क्रूर थट्टा सरकारने केली आहे. शेतकऱयांच्या खात्यात 3 रुपयांपासून 21 रुपयांपर्यंत नुकसानभरपाई जमा झाली आहे. यामुळे शेतकऱयांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे.
अकोला जिल्ह्यातील शेतकऱयांनी खात्यात नुकसानभरपाई जमा झाल्याच्या आनंदात शेतकऱयांनी खाती तपासली तेव्हा त्यांना एक आकडी रक्कम जमा झाल्याचे पाहून धक्काच बसला. सन्मान करता येत नसेल तर अपमान तरी करू नका असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे. अरुण राऊत या शेतकऱयाच्या खात्यावर 5 रुपये 8 पैसे, संदीप घुगे यांना 5 रुपये, गणपत सांगळे यांना 13 रुपये, विजय पेंद्रे याना 14 रुपये 7 पैसे, केशव पेंद्रे यांना 16 रुपये 15 पैसे, आदित्य मुरकुटे यांना 21 रुपये 85 पैसे व उमेश कराड यांच्या खात्यावर 27 रुपये 5 पैसे जमा झालेत.
पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत अकोल्यातील शेतकऱयांच्या खात्यात 3 रुपये, 5 रुपये, 8 रुपये आणि 21 रुपये अशी तुटपुंजी रक्कम जमा झाली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना चेकद्वारे रक्कम परत करत निषेध
आदित्य मुरकुटे आणि केशव केंद्रे यांच्यासह सुमारे पंचवीस शेतकऱयांनी नुकसानभरपाईची ही रक्कम चेकद्वारे जिल्हाधिकाऱयांना परत करून शासनाचा निषेध नोंदवला आहे. इतक्या पैशात काय येते, असा सवाल त्यांनी जिल्हाधिकाऱयांना केला. काही शेतकऱयांनी चिल्लर स्वरूपात ती रक्कम जिल्हाधिकाऱयांना परत केल्याची माहिती आहे. ही थट्टा थांबवा, असे निवेदनही त्यांनी जिल्हाधिकाऱयांना दिले.
 
			 
											
Comments are closed.