‘एमओए’कडून तब्बल 9 संघटनांना मान्यता! खेळ आणि खेळाडूंच्या हितासाठी निर्णय – नामदेव शिरगांवकर

महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या (एमओए) आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानास पात्र असलेल्या राज्य क्रीडा संघटनांची प्राथमिक मतदार यादी जाहीर झाली होती. या यादीतून पाच क्रीडा संघटनांना वगळण्यात आल्याने महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती. मात्र, गुरुवारी (दि.२६) झालेल्या ‘एमओएं’च्या बैठकीत खेळ व खेळाडूंच्या हितासाठी तब्बल ९ राज्य क्रीडा संघटनांना मान्यता देण्यात आली आहे.

‘एमओए’चे महासचिव नामदेव शिरगांवकर यांनी दै. ‘सामना’शी बोलताना ही माहिती दिली. कुस्ती, कबड्डी, बॉक्सिंग, हॅण्डबॉल व जलतरण या खेळांच्या राज्य संघटनांना त्यांच्यातील दुफळीमुळे ‘एमओए’च्या घटनेच्या निकषानुसार मतदार यादीतून वगळण्यात आले होते. या पाच क्रीडा संघटनांवरील कारवाईमुळे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे व योगेश दोडकेसह अनेक खेळाडूंनी आंदोलन छेडले होते. अखेर ‘एमओए’चे महासचिव नामदेव शिरगांवकर यांनी पुण्यातील असोसिएशनच्या मुख्यालयात गुरुवारी तातडीची बैठक बोलावली. यात अनेक विषयांवर चर्चा होऊन कुस्ती, कबड्डी, बॉक्सिंग, हॅण्डबॉल व जलतरण या राज्य क्रीडा संघटनांसह सायकलिंग, नेटबॉल, क्वॅश व याटिंग अशा एकूण ९ राज्य क्रीडा संघटनांना ‘एमओए’ने मान्यता दिली आहे. मात्र, कुस्तीच्या तीन, हॅण्डबॉल, सायकलिंग आदी खेळांच्या दोन-दोन राज्य संघटना आहेत. मग यातील नेमक्या कुठल्या संघटनेला मान्यता देण्यात आली, याबाबत संभ्रम आहे. शिवाय, सायकलिंग, नेटबॉल, क्वॅश व याटिंग या चार नवीन राज्य संघटनांच्या मान्यतेला एमओएच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजुरी घेणे गरजेचे होते. मात्र, तसे घडले नाही. याबाबतची सविस्तर माहिती ‘एमओए’ आपल्या अधिकृत प्रेसनोटमध्ये देणार आहे.

अजित पवारांच्या अध्यक्षपदाची कसोटी

उपमुख्यमंत्री अजित पवार महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत. मात्र, ‘एमओएं’चा आगामी अध्यक्ष हा खेळाडूच असेल, असा निर्धार भाजपच्या क्रीडा आघाडीचे प्रमुख संदीप भोंडवे व योगेश दोडके यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे पुण्याचे खासदार व केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचेही नाव अचानक ‘एमओए’च्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत आले आहे. कारण मुरलीधर मोहोळ स्वतः कुस्तीपटू आहेत. मात्र, अजित पवारदेखील कबड्डीपटू आहेत. शिवाय अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष हा भाजपचा सत्तेतील घटकपक्ष आहे. त्यामुळे पवार इतक्या सहजासहजी ‘एमओए’चे अध्यक्षपद सोडणार नाहीत. मात्र, २ नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीत त्यांच्या अध्यक्षपदाची कसोटी लागणार एवढे नक्की.

Comments are closed.