Maharashtra Politics Bachchu Kadu claimed that Uddhav Thackeray, Sharad Pawar will soon be seen with PM Narendra Modi in Central Government
माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे विधान केले आहे. लवकरच शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे केंद्रात मोदींसोबत दिसतील, असा दावा बच्चू कडूंनी केला आहे.
मुंबई : राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये अनेक राजकीय समीकरणे बदललेली पाहायला मिळाली आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल? याचा काहीही भरोसा नाही. त्यामुळे भविष्यात शरद पवार, उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र आल्यास याबाबत आश्चर्य वाटायला नको, अशी चर्चा सामान्य नागरिकांपासून ते राजकीय वर्तुळातील अनेक लोक करतच असतात. पण आता मात्र, राज्य सरकारमधील एका माजी मंत्र्यानेच पवार-ठाकरे-मोदी या तिघांच्या एकत्र येण्यावर भाष्य केले आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे केंद्रात लवकरच भाजपसोबत जाताना दिसतील, असा दावा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Maharashtra Politics Bachchu Kadu claimed that Uddhav Thackeray, Sharad Pawar will soon be seen with PM Narendra Modi in Central Government)
माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे विधान करत म्हटले की, देशात ज्या मोठ्या राजकीय उलथापालथ होणार आहेत, त्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत असून शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे लवकरच केंद्रात भाजपसोबत जाताना दिसतील, असा थेट दावाच माजी मंत्री कडू यांनी केला आहे. तर, ज्या पद्धतीने नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे एक दोन विधेयक पास करण्यासाठी भाजपासोबत थांबले आहेत, ते गेल्यानंतरची सोय सध्या भाजपा बघत असून त्यात शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची उबाठासेना यांचा प्रामुख्याने विचार आहे. कारण, या दोन्ही पक्षाकडील खासदारांची संख्या पाहता संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य हेच दाखवत आहे, असाही दावा बच्चू कडू यांच्याकडून करण्यात आलेला आहे.
हेही वाचा… Suresh Dhas : योजना वाईट नाही पण… आमदार सुरेश धस म्हणाले, पीकविमा घोटाळा 5000 कोटींचा
महत्त्वाचे म्हणजे, आता पुन्हा आपल्याकडे सत्ता येणार असल्याने कोणी पक्ष सोडून जाऊ नये हाच राऊत यांचा प्रयत्न आहे, असे विधान माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केल्याने राज्याच्या राजकारणात आणि विशेषतः महाविकास आघाडीत कोणता भूकंप होणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडून असलेली गरज सध्या भाजपासाठी संपलेली असून, भाजपाची मोघलाई निती आहे. त्यामुळे जो त्यांच्यापासून लांब जातो त्यांना ते कापून टाकतात हीच भाजपाची निती आहे, असे म्हणत बच्चू कडू यांनी भाजपावर जोरदार प्रहार केला आहे. राज्यात आलेले सरकारच भ्रष्ट मार्गाने आल्याने येथील मंत्री उघडपणे भ्रष्टाचाराबाबत बोलत असतील तर त्यांचे अभिनंदन केले पाहिजे, असा टोलाही यावेळी बच्चू कडू यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना लगावला आहे.
Comments are closed.