Maharashtra Politics Raj Thackeray CM Devendra Fadnavis meet for first time after assembly election
राज ठाकरेंनी ईव्हीएमबाबत उपस्थित केलेल्या शंकेनंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. सोमवारी (ता. 10 फेब्रुवारी) सकाळीच राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस पोहोचल्याने राजकीय वर्तुळात याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
मुंबई : काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत त्यांना मिळालेल्या मतांबाबत आणि आलेल्या निकालाबाबत शंका उपस्थित केली होती. त्यावेळी राज ठाकरे यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला होता. पण या सर्व टीकेनंतर आणि राज ठाकरेंनी ईव्हीएमबाबत उपस्थित केलेल्या शंकेनंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. सोमवारी (ता. 10 फेब्रुवारी) सकाळीच राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस पोहोचल्याने आता राजकीय वर्तुळात याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे आणि फडणवीस यांची ही सदिच्छा भेट असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. परंतु, राज्यातील दोन बड्या नेत्यांच्या या भेटीमुळे राजकारणातील समीकरण बदलणार की अजून काही होणार, याबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. (Maharashtra Politics Raj Thackeray CM Devendra Fadnavis meet for first time after assembly election)
सोमवारी सकाळी 10 वाजताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचले. ज्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. कारण दोन आठवड्यांपूर्वीच राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीला आणि विशेषतः अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळालेल्या जागांवरून ईव्हीएमबाबत शंका उपस्थित केली होती. तर राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणातून भाजपावर सुद्धा अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता. त्यामुळे भाजपा आणि मनसेमध्ये नवा वाद निर्माण झाला. पण आता अचानक थेट मुख्यमंत्रीच राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचल्याने या दोघांच्या भेटीबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत.
तर ही एक सदिच्छा भेट असल्याचे मनसे आणि भाजपाच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. परंतु, राज ठाकरे यांनी स्वतःच मुख्यमंत्री फडणवीस यांना सकाळचा नाश्ता करण्याचे निमंत्रण दिले होते आणि त्याचमुळे फडणवीस मित्र म्हणून ठाकरेंच्या घरी गेल्याचे भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्याकडून सांगण्यात आले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना लाड यांनी हे विधान केले आहे. परंतु, या भेटीत ठाकरे आणि फडणवीस या राज्यातील दोन बड्या नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
Comments are closed.