पृथ्वी शॉ आणि ऋतुराज गायकवाडला संघात स्थान; या खेळाडूकडे कर्णधारपदाची धुरा
भारतातील प्रतिष्ठेच्या रणजी ट्रॉफीच्या 2025-26 हंगामाला 15 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र संघाने आपला 16 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. अनुभवी फलंदाज अंकित बावणे याच्यावर पुन्हा एकदा कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे यंदाच्या हंगामासाठी पृथ्वी शॉ, जलज सक्सेना आणि ऋतुराज गायकवाड यांच्यासारखे स्टार खेळाडू महाराष्ट्राच्या संघात सहभागी झाले आहेत.
पृथ्वी शॉने आपल्या करिअरमधील नव्या पर्वाची सुरुवात महाराष्ट्रातून करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईकडून सातत्याने संधी न मिळाल्यानंतर व लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये स्थान गमावल्यानंतर त्याने महाराष्ट्राचा रस्ता धरला. शॉने आतापर्यंत भारताकडून 5 कसोटी, 6 वनडे आणि 1 टी20 सामना खेळला आहे. मात्र, सातत्याच्या अभावामुळे तो भारतीय संघात आपले स्थान निश्चित करू शकला नाही.
जलज सक्सेना याने 2005-06 मध्ये मध्य प्रदेशकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तो केरळकडून खेळत राहिला. गेल्या वर्षी त्याने केरळकडून रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला होता. विदर्भ विरुद्धच्या त्या अंतिम सामन्यात केरळला पराभवाचा सामना करावा लागला होता.
संघ निवड करताना निवड समितीने अनुभवाला अधिक महत्त्व दिले. त्यामुळेच युवा गोलंदाज राजवर्धन हंगरगेकरऐवजी प्रदीप दाधे याच्यावर विश्वास दाखवण्यात आला आहे.
महाराष्ट्राला ग्रुप बी मध्ये ठेवण्यात आले असून या गटात त्यांच्यासोबत केरळ, सौराष्ट्र, चंदीगड, कर्नाटक, मध्य प्रदेश, पंजाब आणि गोवा या संघांचा समावेश आहे. महाराष्ट्राचा पहिला सामना 15 ते 18 ऑक्टोबर दरम्यान तिरुवनंतपुरम येथे केरळविरुद्ध होणार आहे.
महाराष्ट्र रणजी लीग 2025-26:
अंकित बावणे (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, पृथ्वी शॉ, अर्शिन कुलकर्णी, सिद्धेश वीर, सौरभ नवले (यष्टीरक्षक), मंदार भंडारी (यष्टीरक्षक), जलज सक्सेना, विक्की ओस्तवाल, रामकृष्ण घोष, मुकेश चौधरी, प्रदीप दाधे, हितेश वालुंज, सिद्धार्थ म्हात्रे, हर्षल काटे, रजनीश गुरबानी.
Comments are closed.