Sangali Crime News – MBBS च्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, तीन जणांना अटक

देशभरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात सामूहिक बलात्काराची एक धक्कादायक घटना उघड झाली आहे. एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर तिच्या दोन वर्गमित्रांनी आणि त्यांच्या एका मित्राने सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी शुक्रवारी ही माहिती दिली असून तिन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 18 मे रोजी ही घटना घडली. यावेळी पीडिता आणि तीन मित्र रात्री 10 वाजता थिएटरमध्ये चित्रपट पाहण्यासाठी जाण्याचा बेत आखत होते. यावेळी चित्रपट पाहण्यापूर्वी एक आरोपी पीडितेला एका फ्लॅटमध्ये घेऊन गेला. यावेळी त्या नराधमाने पीडितेला जबरदस्तीने दारू पाजली. दारू प्यायल्यामुळे काही वेळाने तिला चक्कर आल्याचे पीडितेने पोलिसांना सांगितले.
दरम्यान, पीडितेला गुंगी आल्याची संधी साधून या तीन नराधमांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यानंतर तिने घडलेल्या प्रकाराबाबत कोणाला सांगू नये यासाठी तिला धमकी देण्यात आली. जर याबाबत कोणालाही सांगितले तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असे तिला सांगितले. मात्र कर्नाटकातील बेळगाव येथील रहिवासी असलेल्या पीडितेने धाडस करून आपल्या पालकांना ही घटना सांगितली. त्यामुळे तिच्या पालकांनी तातडीने पोलिसात तक्रार दाखल केली.
पोलिसांना तक्रार मिळताच त्यांनी आरोपींचा शोध घेतला आणि पुणे, सोलापूर आणि सांगलीचे रहिवाशी असलेल्या तिन्ही आरोपींना अटक केली आहे. तसेच आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलमांतर्गत सामूहिक बलात्कार आणि इतर आरोपांसाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयाने त्यांना 27 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
Comments are closed.