Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला

Sanjay Raut PC  :  जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा अत्यंत वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील  यांनी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या ‘नंदनवन’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील उपस्थित होते. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली, ज्यापैकी अर्धा तास जयंत पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यात ‘बंद दाराआड’ गुप्त चर्चा झाल्याची माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.या भेटीवर ठाकरे गट खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, “ते लोक रामदास आठवले यांना भेटले तर तुम्ही त्यांना आठवले यांच्या पक्षात जाणार असे म्हणणार का? महाराष्ट्र आणि देशात इतके राजकीय पक्ष बनले आहेत की, कोणी ना कोणी कोणाशी भेटत असतात. जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हे सर्व पक्षाच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत असतात. ते ‘फ्री बर्ड्स’ आहेत, त्यांना भेटू द्या,” असे त्यांनी म्हटले आहे. जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बंद दाराआड नेमकी कोणती गुप्त चर्चा झाली, याबाबत सध्या अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली होती. त्यावेळी तेथे प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे हेदेखील उपस्थित होते. या पाठोपाठ काल थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यामुळे राज्यात काहीतरी मोठे राजकीय फेरबदल होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Comments are closed.