बोगस क्रीडा प्रमाणापत्राला बसणार चाप, खेळाडूंना मिळणार आता घरबसल्या क्रीडा ई-प्रमाणपत्र

पुणे : राज्यातील गुणवंत खेळाडूंना शासकीय आणि निमशासकीय सेवांमध्ये ५ टक्के आरक्षणाचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद गतीने मिळण्याकरिता क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने ‘क्रीडा ई-प्रमाण’ ही ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारीत अद्ययावत प्रणाली कार्यान्वित केली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग तसेच इतर सर्व शासकीय पदभरतीसाठी अर्ज करताना खेळाडूंना आता ‘क्रीडा ई-प्रमाणपत्राची प्रत जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे. या प्रमाणपत्राशिवाय खेळाडू संवर्गातून अर्जाचा विचार केला जाणार नाही, तसेच ज्या खेळांचे अभिलेख प्रणालीवर उपलब्ध आहे, त्यांनी तात्काळ या प्रणालीचा लाभ घेऊन आपले डिजिटल पडताळणी प्रमाणपत्र घरबसल्या प्राप्त होणार आहे.

ज्यामुळे बोगस प्रमाणपत्रांना पूर्णपणे आळा – क्रीडा आयुक्‍त शीतल तेली-उगले
ब्लॉकचेन तंत्रज्ञान ही प्रणाली ब्लॉकचेन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असल्याने यामध्ये कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप किंवा फेरफार करता येत नाही. ज्यामुळे बोगस प्रमाणपत्रांना पूर्णपणे आळा बसणार आहे. असे सांगून क्रीडा आयुक्‍त शीतल तेली-उगले यांनी सांगितले की, खेळाडूने माहिती भरल्यानंतर आणि मूळ माहितीशी ती जुळल्यास, अवघ्या २४ तासांच्या आत डिजिटल पडताळणी अहवाल उपलब्ध होणार आहे. प्रत्येक प्रमाणपत्रावर एक अद्वितीय क्युआर कोड असल्यामुळे संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्यांना प्रमाणपत्राची सत्यता त्वरित पडताळणी करता येणार आहे.

ज्या खेळाडूंनी यापूर्वी विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा यांच्याकडून प्रमाणपत्रांची पडताळणी केलेली आहे, त्यांनी यापुढे शासकीय व निमशासकीय भरतीसाठी अर्ज सादर करावयाचा असल्यास, या प्रणालीद्वारे प्रमाणपत्र तयार करुन घेणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी आणि मार्गदर्शक सूचनांसाठी खेळाडूंनी https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहल क्रीडा उपसंचालक सुधीर मोरे यांनी केले आहे.

Comments are closed.