भाडेवाढीनंतर लालपरी प्रवाशांना नकोशी, दिवसाला तीन लाख प्रवाशी घटले

आर्थिक तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढविण्यासाठी सरकारने भाडेवाढ केली. या भाडेवाढीने महामंडळाच्या उत्पन्नात भर पडण्याऐवजी एसटीच्या प्रवासी संख्येत मोठी घट झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत प्रतिदिन तीन लाखांनी प्रवासी कमी झाल्यामुळे एसटी महामंडळ उत्पन्न वाढविण्यात पुरते हतबल ठरले आहे. भाडेवाढीमुळे अनेक प्रवाशांनी लाडक्या ‘लालपरी’कडे पाठ फिरवल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्राची ‘जीवनवाहिनी’ असलेल्या एसटी महामंडळाची सध्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे. महामंडळाचे चाक तोटय़ात रुतलेले असल्यामुळे कर्मचाऱयांची थकीत देणी तब्बल सात हजार कोटी रुपयांवर गेली आहेत. ही थकीत रक्कम देण्यासाठी राज्य सरकारने पुरेसा निधी उपलब्ध करावा, अशी मागणी करण्यात आली. मात्र महायुती सरकारने अर्थसंकल्पात एसटी महामंडळाच्या पदरात निराशा टाकली. त्यातच भाडेवाढीचा प्रवासी संख्येवर मोठा परिणाम झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. एसटीची नुकतीच 14.95 टक्के भाडेवाढ करण्यात आली. गेल्या वर्षाची 1 ते 18 मार्चची एकूण आकडेवारी व याच कालावधीतील यंदाची आकडेवारी तपासली तर भाडेवाढीनंतर ठरवून दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे दिवसाचे सरासरी उत्पन्न 31 कोटी 74 लाख इतके अपेक्षित होते. प्रत्यक्षात प्रतिदिन सरासरी 27 कोटी 66 लाख रुपये इतकेच उत्पन्न मिळाले आहे. तसेच गेल्या वर्षी याच काळात प्रवासी संख्या 41 लाख इतकी होती. त्यात प्रतिदिन तीन लाखांनी घट झाली असून ती 38 लाखांवर आली आहे. एसटीची भाडेवाढ करूनही अपेक्षित उत्पन्न मिळविण्यात महामंडळ हतबल ठरले आहे. दिवसाला साधारण चार कोटी रुपये इतकी रक्कम अपेक्षेपेक्षा कमी मिळत आहे
सूक्ष्म कृती आराखडा तयार करण्याची मागणी
एसटी महामंडळाला बिकट आर्थिक स्थितीतून बाहेर काढण्यासाठी सरकारकडून तत्काळ श्वेतपत्रिका काढण्यात यावी, तसेच उत्पन्न वाढवण्यासाठी आणि कर्मचाऱयांच्या थकीत रकमा देण्यासाठी सूक्ष्म कृती आराखडा तयार करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे. तसे निवेदन सरकारला दिले आहे.
Comments are closed.