Maharashtra state government will put forward a list of financial demands in the 16th Finance Commission meeting
गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लागू केलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ आणि अन्य लोकानुययी घोषणांमुळे कमालीच्या आर्थिक अडचणीत सापडलेल्या राज्य सरकारने केंद्र सरकारकडे अधिकच्या निधीची मागणी करण्याची तयारी केली आहे. आज (08 मे) होणाऱ्या सोळाव्या वित्त आयोगाच्या बैठकीत राज्य सरकारकडून आर्थिक मागण्यांची जंत्री ठेवली जाईल.
– प्रेमानंद बच्छाव
मुंबई : गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लागू केलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ आणि अन्य लोकानुययी घोषणांमुळे कमालीच्या आर्थिक अडचणीत सापडलेल्या राज्य सरकारने केंद्र सरकारकडे अधिकच्या निधीची मागणी करण्याची तयारी केली आहे. आज (08 मे) होणाऱ्या सोळाव्या वित्त आयोगाच्या बैठकीत राज्य सरकारकडून आर्थिक मागण्यांची जंत्री ठेवली जाईल. केंद्रीय करातून राज्याला मिळणाऱ्या हिश्श्यात वाढ करावी, मुंबईतील पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना भरीव अर्थसाह्य द्यावे तसेच नाशिकमध्ये होऊ घातलेल्या कुंभमेळ्यासाठी अधिक निधी द्यावा, आदी मागण्या राज्य सरकारकडून आयोगासमोर ठेवल्या जाणार असल्याचे कळते. (Maharashtra state government will put forward a list of financial demands in the 16th Finance Commission meeting)
एकूण कर महसुलातील केंद्र आणि राज्य सरकारचा वाटा निश्चित करणे, राज्यांना दिली जाणारी आर्थिक मदत, अनुदान यासंदर्भात केंद्राला धोरणात्मक शिफारशी करण्यासाठी केंद्र सरकारने 2026 ते 2031 अशा पाच वर्षासाठी 16 व्या वित्त आयोगाचे गठन केले आहे. या आयोगाला 31 ऑक्टोबर 2025 पूर्वी आपल्या शिफारशी केंद्राला सादर करायच्या आहेत. अरविंद पनागरिया यांच्या अध्यक्षतेखाली 16 व्या वित्त आयोगाचे सदस्य अजय झा, ॲनी मॅथ्यू, मनोज पांडा आणि ऋत्विक पांडे यांचे बुधवारी (07 मे) मुंबईत आगमन झाले. त्यानंतर आज सह्याद्री अतिथीगृह येथे वित्त आयोगाची दिवसभर बैठक चालणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार हे राज्य सरकारच्या मागण्या आयोगासमोर ठेवणार आहेत. यावेळी आयोगासमोर राज्याच्या आर्थिक स्थितीचे सादरीकरण केले जाईल. तसेच पंधराव्या वित्त आयोगाकडून महाराष्ट्राला किती निधी मिळाला आणि तो कोणत्या योजनांवर खर्च झाला याची माहिती आयोगाला दिली जाणार आहे.
हेही वाचा – OPERATION SINDOOR : पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा जगासमोर; दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात लष्करी अधिकारी उपस्थित
राज्याच्या नागरीकरणाचा वाढता वेग आणि लोकसंख्या लक्षात घेऊन राज्य सरकारने 14 व्या आणि 15 व्या वित्त आयोगासमोर मोठ्या अपेक्षेने महत्त्वाच्या मागण्या ठेवल्या होत्या. मात्र, तेव्हा केंद्राकडून महाराष्ट्राच्या पदरात फारसे काही पडले नव्हते. महाराष्ट्रातून केंद्र सरकारला दरवर्षी काही लाख कोटी रुपये कराच्या रूपाने मिळतात. मात्र, त्या प्रमाणात महाराष्ट्राला केंद्राकडून कराचा हिस्सा मिळत नाही. ही बाब पुन्हा एकदा आयोगासमोर मांडली जाणार आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईचे महत्त्व लक्षात घेऊन मुंबईच्या विकासासाठी निधी द्यावा. विदर्भ आणि मराठवाड्याला सुद्धा निधी मिळावा, अशी मागणी आयोगाकडे करण्यात येणार असल्याचे समजते. दरम्यान, वित्त आयोग आजच्या बैठकीत विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना भेटून चर्चा करणार आहे.
वित्त आयोगाची बडदास्त
मुंबईत बैठकीसाठी आलेल्या 16 व्या वित्त आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांची राज्य सरकारने खास बडदास्त ठेवली आहे. अध्यक्ष आणि सदस्यांचा मुक्काम मंत्रालय शेजारील पंचतारांकित हॉटेलमध्ये आहे. आजच्या दिवसभरच्या बैठका आणि भेटीगाठींच्या सत्रानंतर वित्त आयोगासाठी संध्याकाळी हॉटेल ट्रायडंट येथे एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील पारंपरिक कलांचे सादरीकरण केले जाणार आहे.
हेही वाचा – RAJNATH SINGH : भारतीय सैन्याकडून हनुमानजींच्या आदर्शाचे पालन; ऑपरेशन सिंदूरवर काय म्हणाले संरक्षण मंत्री?
नाशिक महापालिकेला भेट देणार
दरम्यान, 9 मे रोजी वित्त आयोग नाशिकला भेट देणार आहे. 2027 मध्ये नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याबाबत नाशिक महापालिका आयोगाला सादरीकरण करणार आहे. नाशिकच्या एक दिवसाच्या दौऱ्यात आयोग त्र्यंबकेश्वर मंदिर, पंचवटी आणि वायनरीला भेट देणार आहे. दुसऱ्या दिवशी आयोगाचा शिर्डी दौरा आहे. शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेऊन आयोग नवी दिल्लीला रवाना होणार आहे.
Comments are closed.