महाराष्ट्राच्या लेकींनी इतिहास घडवला! गुजरातला नमवत अंडर-19 वनडे ट्रॉफीवर नाव कोरलं
महाराष्ट्राच्या अंडर-19 महिला क्रिकेट संघाने शानदार कामगिरी करत बीसीसीआय अंडर-19 महिला वनडे ट्रॉफी जिंकली आहे. पुण्यातील गहुंजे येथील एमसीए स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने गुजरातचा 7 गडी राखून पराभव केला आणि राष्ट्रीय वनडे स्पर्धेतील आपले वर्चस्व सिद्ध केले.
अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करत गुजरात संघाने 46.5 षटकांत 223 धावा केल्या. गुजरातकडून चार्ली सोलंकी (56) आणि दिया वर्धानी (81) यांनी शानदार खेळी खेळली. मात्र महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी सामन्यावर पकड मजबूत ठेवली. ग्रीष्मा कटरियाने अप्रतिम गोलंदाजी करत 4 गडी बाद केले, तर प्रेरणा सावंतने 3 बळी घेतले. या दोघींच्या प्रभावी गोलंदाजीमुळे गुजरातला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
223 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना महाराष्ट्राच्या फलंदाजांनी संयमी खेळ दाखवला. सह्याद्री सिंग (57) आणि अक्षया जाधव (54) यांनी दमदार अर्धशतके झळकावत संघाला मजबूत सुरुवात करून दिली. भव्यिका अहिरे (46*) हिने शेवटपर्यंत नाबाद राहत संघाला विजय मिळवून दिला. महाराष्ट्राने 39.4 षटकांतच लक्ष्य गाठत सामना आपल्या नावावर केला.
या विजयाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, काही महिन्यांपूर्वीच वरिष्ठ महिला संघाने टी20 ट्रॉफी जिंकली होती. त्यामुळे अंडर-19 आणि वरिष्ठ अशा दोन्ही स्तरांवर महाराष्ट्राच्या महिला क्रिकेटचे यश अधोरेखित झाले आहे. संपूर्ण स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात सातत्य राखले. संघाने संपूर्ण मालिकेत एकही सामना गमावला नाही. अपराजित राहून महाराष्ट्राच्या लेकींनी ही कामगिरी केली.
Comments are closed.