Maharashtra Weather Meteorological department predicts that temperature of state will increase


राज्यात सध्या काही भागांमध्ये थंडी तर काही भागांमध्ये उकाडा असे तापमान असल्याचे पाहायला मिळत आहे. रात्रीच्या वेळी कुडकुडणारी थंडी, तर दिवसा घाम काढणारे उन्हाचे चटके यामुळे नागरिक बदलत्या तापमानामुळे हैराण झाले आहेत.

मुंबई : राज्यात सध्या काही भागांमध्ये थंडी तर काही भागांमध्ये उकाडा असे तापमान असल्याचे पाहायला मिळत आहे. रात्रीच्या वेळी कुडकुडणारी थंडी, तर दिवसा घाम काढणारे उन्हाचे चटके यामुळे नागरिक बदलत्या तापमानामुळे हैराण झाले आहेत. परंतु, येत्या काही दिवसांमध्ये काही भागांमध्ये असलेली थंडी कमी होऊन उकाडा वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. तर, आता हा गारवा पूर्णतः कमी होणार असून फेब्रुवारी महिन्यातच उन्हाचे चटके लागणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून दोन दिवसांपूर्वी व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर आता या तापमान बदलाला सुरुवात झाली असून कमाल तापमानाचा पारा आतापासूनच 35 अंश ओलांडत असल्याची नोंद होत आहे. (Maharashtra Weather Meteorological department predicts that temperature of state will increase)

प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या 5 दिवसांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात किमान तापमानात उन्हाचा चटका अधिक जाणवणार असून उकाडा जाणवण्यास सुरुवात होणार आहे. प्रादेशिक हवामान अंदाजानुसार, येत्या 2 दिवसात तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होऊन नंतर तापमान हळूहळू कमी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तर, येत्या 3 दिवसांमध्ये विदर्भात फारसा बदल नसेल . पण त्यानंतर 2-3 अंशांनी घसरणार आहे. बहुतांश ठिकाणी कोरडे आणि शुष्क तापमान राहणार आहे. सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती पूर्व राजस्थान आणि आजूबाजूच्या परिसरात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात राजस्थानसह उत्तर प्रदेशच्या काही भागात वादळी वाऱ्यांसह पावसाची चिन्हे आहेत.

हेही वाचा… Prithviraj Mohol : पृथ्वीराज मोहोळ यंदाचा महाराष्ट्र केसरी, गोंधळानंतर महेंद्र गायकवाडने सोडलं मैदान

मुंबईतील तापमानात 20.8 अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली आहे. रविवारी कुलाबा हवामान विभागाने ही नोंद केली आहे. तर, दुसरीकडे सांताक्रूझ हवामान विभागाने 18.6 अंश तापमान नोंदवले आहे. त्यामुळे सध्या तरी मुंबईत सकाळच्यावेळी बऱ्यापैकी गारवा जाणवत आहे. त्याशिवाय, नाशिकमध्ये 12 ते 16 अंशांची नोंद करण्यात आली आहे. पुण्यात 14 ते 16 अंश सेल्सिअस एवढे तापमान नोंदवले गेले. सोलापुरात बहुतांश ठिकाणी 18 ते 20 अंशांची नोंद झाली. नगरमध्ये 15 अंश किमान तापमान नोंदविण्यात आले आहे. तसेच, मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी 15 ते 21 अंशांची नोंद झाली. लातूरमध्ये रविवारी 21.1 अंश, बीडमध्ये 17 अंश तापमान होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 17.5 अंश तर हिंगोलीत 16.9, नांदेडमध्ये 18.7 अंश तापमान नोंदवण्यात आले.



Source link

Comments are closed.