Maharashtra Weather Unseasonal rain hits Vidarbha, two die in Chandrapur
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. मुंबईत उन्हाचा तडाखा बसत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. पण दुसरीकडे मात्र, विदर्भाला अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. मुंबईत उन्हाचा तडाखा बसत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. पण दुसरीकडे मात्र, विदर्भाला अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. अवकाळी पावसामुळे विदर्भाला मोठे नुकसान सहन करावे लागत असून चंद्रपुरात दोन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी माहिती समोर आली आहे. विदर्भात सलग दोन दिवस अवकाळी पाऊस पडत असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. तर आता हवामान विभागाकडून 15 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. (Maharashtra Weather Unseasonal rain hits Vidarbha, two die in Chandrapur)
15 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट
हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, मुंबईतील किमान तापमान 26 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. मुंबईत दुपारी किंवा संध्याकाळनंतर वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्याशिवाय, ठाणे, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा, पालघर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजी नगर, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, बीड, अमरावती, भंडारा या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, गडचिरोली आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याशिवाय, बुलढाणा, अकोला आणि वाशिम वगळता राज्यातील उर्वरित जिल्ह्यांत हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
हेही वाचा… WAVES Summit : ‘वेव्ह्ज’मध्ये 8 हजार कोटींचे करार, मुंबईतील परिषदेचा समारोप
विदर्भाला अवकाळीचा तडाखा
विदर्भात सलग दोन दिवस अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. शनिवारी आणि रविवारी असे सलग दोन दिवस विदर्भात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर, नागपूर शहरात जोरदार पावसासोबत गारांचाही वर्षाव झाला. गडचिरोलीत शनिवारी रात्रीपासून रविवार सकाळपर्यंत 62.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर गोंदिया, भंडारा, वर्धा जिल्ह्यात विजा व ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार पावसाने हजेरी लावली. वर्धा जिल्ह्यात सेलू तालुक्यातील सुरगाव परिसरात रविवारी दुपारी सुमारे अर्धा तास बोरांच्या आकाराच्या गारांचा पाऊस पडला. यामुळे केळी पिकासह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या अवकाळीमुळे शेतकरी मात्र मोठ्या संकटात सापडला आहे.
चंद्रपुरात दोघांचा मृत्यू
चंद्रपूर जिल्ह्यात रविवारी (ता. 4 मे) संध्याकाळच्या सुमारास अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी माहिती समोर आली आहे. चंद्रपुरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये हे मृत्यू झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर शहरातल्या आकाशवाणी परिसरात रविवारी संध्याकाळी वादळामुळे विजेची एक तार तुटून रस्त्यावर पडली होती, रात्री या परिसरात सायकलने जाणाऱ्या एका सुरक्षारक्षकाचा या तारेला स्पर्श झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. प्रभाकर शिरसागर (वय वर्ष 52) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर चिमूर तालुक्यातल्या हिवरा येथे विज पडून एका मेंढपाळाचा मृत्यू झाला आहे. विकास ढोरे (वय वर्ष 45) असे मृत मेंढपाळाचे नाव आहे.
Comments are closed.