Maharashtra Winter Session 2024 Clash between the Mahayuti and MVA in Legislative Assembly over Dr. Babasaheb Ambedkar photo PPK


गेल्या दोन दिवसांपासून नागपूर विधान भवनात विरोधक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो हातात घेऊन आंदोलन करत आहेत. शुक्रवारी (ता. 20 डिसेंबर) विरोधकांनी आंबेडकरांचा फोटो विधानसभेत लावल्यानंतर विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले.

नागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केलेल्या विधानामुळे देशातील राजकीय वातावरण तापले आहे. संसदेत या प्रकरणाचे पडसाद उमटत असताना नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनातही याचे पडसाद उमटल्याचे पाहायला मिळत आहेत. कारण गेल्या दोन दिवसांपासून नागपूर विधान भवनात विरोधक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो हातात घेऊन आंदोलन करत आहेत. शुक्रवारी (ता. 20 डिसेंबर) विरोधकांनी आंबेडकरांचा फोटो विधानसभेत लावल्यानंतर विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. (Maharashtra Winter Session 2024 Clash between the Mahayuti and MVA in Legislative Assembly over Dr. Babasaheb Ambedkar photo)

मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी काँग्रेसकडून आज शुक्रवारी (ता. 20 डिसेंबर) स्थगन प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रस्तावाला अनुमती दिली नाही. त्यामुळे कामकाज सुरू होताच काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी मुंबई काँग्रेस कार्यालयावर भाजपाकडून झालेल्या हल्ल्याचा मुद्दा उपस्थित केला. आमच्या पक्ष कार्यालयावर हल्ला करण्यात आला. दगड घेऊन काचा फोडल्या, खुर्च्या फेकण्यात आल्या. आमच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या फोटोवर शाई फेकण्यात आली. मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांचा फोटो फाडण्यात आला. या हल्ल्यात कार्यालयातील कर्मचारी जखमी झाले. काँग्रेस कार्यालय उद्ध्वस्त करण्यात आले. बहुमताच्या जोरावर भाजप सत्तेची मस्ती करत असतील ते योग्य नाही, असे बजावत वडेट्टीवार यांनी सर्व हल्लेखोरांच्या कारवाई करण्याची मागणी केली.

– Advertisement –

हेही वाचा… Maharashtra Winter Session 2024 : विधासभेत बोलण्यास कमी वेळ दिल्याने अपक्ष आमदाराचा टोला, म्हणाले…

या दरम्यान सभागृहात उपस्थित उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेस आमदारांच्या बाकावर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेवरून आम्हालाही त्यांची प्रतिमा लावू देण्याची मागणी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर कोणत्या एकाचा अधिकार नाही. ते आपल्या सर्वांचे आहेत. त्यामुळे आम्हालाही त्यांची प्रतिमा लावण्याची परवानगी द्यावी, असे अजित पवार म्हणाले. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी सभागृहात फलक, महापुरुषांचे फोटो लावणे ही आपली परंपरा नाही. सार्वभौम सभागृहात नियमानुसार कामकाज झाले पाहिजे. संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आपल्या सर्वांच्या मनात आदराची भावना आहे, त्यांचे स्थान आपल्या हृदयात आहे. संविधानातील नियमांचे पालन करावे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. अन्यथा आपल्याकडून संविधानाचा अपमान होऊ शकतो, असे सांगत राहुल नार्वेकर यांनी काँग्रेस सदस्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा काढण्याची सूचना केली.

– Advertisement –

यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांमध्ये आरोप – प्रत्यारोप सुरू झाले. महायुतीच्या आमदारांकडून आघाडीच्या आमदारांचा उल्लेख ढोंगी असा केला जात होता. तर आघाडीकडून ‘जयभीम’चा गजर करून प्रत्युत्तर दिले जात होते. सभागृहात सुरू असलेला गोंधळ लक्षात घेऊन राहुल नार्वेकर यांनी सभागृहाचे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब केले. दरम्यान, विधिमंडळाचे कामकाज होण्यापूर्वी आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर एकत्र येत मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. ‘महायुतीची महागुंडशाही’ असा फलक हातात धरून आघाडीच्या आमदारांनी महायुतीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.


Edited By Poonam Khadtale



Source link

Comments are closed.