हॉकीत महाराष्ट्राच्या महिलांनी बलाढ्य झारखंडला बरोबरीत रोखले!

हरिद्वार : अनेक ऑलिंपिक खेळाडूंचा समावेश असलेल्या बलाढ्य झारखंड संघाला गोलशून्य बरोबरीत रोखून महाराष्ट्राच्या महिला हॉकी संघाने ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील बाद फेरीच्या आशा कायम राखल्या.

साखळी गटामधील या सामन्यात झारखंडचे पारडे जड मानले जात होते. त्यांनी सातत्याने धोकादायक चाली रचत तब्बल ८ पेनल्टी कॉर्नर मिळविले. परंतु महाराष्ट्राच्या संरक्षण फळीने त्यांच्या या सर्व चाली रोखण्याचा पराक्रम केला. महाराष्ट्राच्या सानिका माने, हिमांशी गावंडे व दुर्गा शिंदे यांच्यासह आघाडीच्या फळीतील खेळाडूंनी काही चांगल्या चाली करीत ३ पेनल्टी कॉर्नरही मिळाले. मात्र, यावर गोल करण्यात त्यांना यश मिळाले नाही.

महाराष्ट्राचे आता चार गुण झाले असून साखळी गटातील उर्वरित सामन्यात महाराष्ट्राला मणिपूर, मिझोराम या संघांच्याही आव्हानास सामोरे जावे लागणार आहे. या सामन्यांमध्ये विजय मिळवला, तर महाराष्ट्राला बाद फेरीत स्थान मिळवता येईल.

Comments are closed.