38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा; मिहिर आम्ब्रे, ऋषभ दासला सुवर्ण, तर प्रतिष्ठा, अवंतिकाला रौप्य

38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा उत्तराखंड 2024-25 हलद्वानी : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील जलतरणात सलग तिसर्‍या दिवशी महाराष्ट्राने पदकांचा चौकार झळकविला. ऋषभ दासने 200 मिटर बॅक स्टोक्स प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई केली, तर मिहिर आम्ब्रेने 50 मिटर फ्री स्टाईल प्रकारात सोनेरी यश संपादन केले. प्रतिष्ठा डांगी हिने महिलांच्या 200 मिटर बॅक स्ट्रोक प्रकारात अवंतिका चव्हाण ने 50 मिटर फ्री स्टाईलमध्ये रुपेरी यश संपादन केले.

इंदिरा गांधी इंटरनॅशनल स्टेडियममधील जलतरण तलावात सलग तिसर्‍या दिवशी महाराष्ट्राने पदकाची लयलुट केली. ऋषभ दासने 200 मिटर बॅक स्ट्रोक प्रकारात 2 मिनिटे 3.34 सेकंद वेळेसह सुवर्ण पदकावर नाव कोरले. तमिळनाडूचा निथिक नाथेल्ला रौप्य, तर गुजरातचा देवांश परमार कांस्यपदकाचा मानकरी ठरला.

मिहिर आम्ब्रेने 50 मिटर फ्री स्टाईल प्रकारात 24.29 सेकंदात बाजी मारत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. कर्नाटकचा श्रीहरी नटराज रौप्य, तर तमिळनाडूचा जोशुआ थॉमसने कांस्यपदक जिंकले. महिलांच्या गटात प्रतिष्ठा डांगीला दोन सेकंदाच्या फरकाने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. बंगालच्या सौब्रिती मोंडल हिने 2 मिनिटे 24.41 सेकंद वेळेसह सुवर्ण पदक जिंकले. ओडिशाची प्रत्याशा राय हिने कांस्यपदक जिंकले. अवंतिका चव्हाण हिने 27.28 सेकंद वेळेसह रौप्यपदकाला गवसणी घातली. कर्नाटकची धिनिधी देसिंघु ही 26.96 सेकंद वेळेसह सुवर्ण पदकाची मानकरी ठरली, तर कर्नाटकच्या निना व्यंकटेश हिला कांस्यपदक मिळाले.

Comments are closed.