जिल्हा परिषदेत भाजपची सरशी, राष्ट्रवादी आणि शिंदे गटालाही यश
राज्याची मिनी विधानसभा असे म्हटले जाणाऱया जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गासह राज्यातील 12 जिल्हा परिषदा व 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला सर्वाधिक जागा मिळाल्या. 6 जिल्हा परिषदांत भाजपची सरशी झाली. तर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदे गटाला प्रत्येकी एका जिल्हा परिषदेत निर्विवाद यश मिळाले. शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी कॉँग्रेस सांगली जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. रायगड आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे.
राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशीव आणि लातूर या 12 जिल्हा परिषदांच्या 731 आणि त्या अंतर्गत येणाऱया पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी सरासरी 68 टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी झाली. यामध्ये सर्वाधिक 6 जिल्हा परिषदा आणि 48 पंचायत समित्यांमध्ये भाजपला बहुमत मिळाले. शिंदे गटाला एका जिल्हा परिषदेत आणि 26 पंचायत समित्यांमध्ये तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला एका जिल्हा परिषदेत आणि 23 पंचायत समित्यांमध्ये बहुमत मिळाले. शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीला सांगली जिल्हा परिषदेत चांगले यश मिळाले असून 8 पंचायत समित्यांमध्ये बहुमत मिळाले. शिवसेनेला 5 पंचायत समित्या, कॉँग्रेसला 8 ठिकाणी यश मिळाले.
भाजप सिंधुदुर्ग, सोलापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, धाराशीव आणि परभणी जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. रत्नागिरी, रायगडमध्ये शिंदे गटाला यश मिळाले आहे, तर अजितदादा गटाने पुण्यात एकहाती सत्ता मिळवली आहे. सांगली जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी कॉँग्रेस मोठा पक्ष ठरला असून कोल्हापूरमध्ये घडय़ाळ चिन्हावर लढणाऱया दोन्ही राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. लातूरमध्ये कॉँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ गाठता आलेले नाही. महाविकास आघाडीतील मित्र पक्षांना फारशा जागा मिळाल्या नाहीत. यामुळे या ठिकाणी भाजप, अजितदादा आणि शिंदे गटाला सत्तेसाठी एकत्र यावे लागणार आहे.
माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांची पत्नी पराभूत
सातारा जिह्यातील पाटण तालुक्यात मंद्रुकोळे गटातून माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांची पत्नी प्राची पाटील भाजपकडून निवडणुकीत उतरल्या होत्या. त्यांचा शिंदे गटाच्या मृणाल पाटील यांनी पराभव केला. जिह्यातील सर्वात लहान जिल्हा परिषद सदस्य मृणाल पाटील विजयी झाल्या.
सांगोला पंचायत समितीमध्ये शेकापला यश
सांगोला पंचायत समितीवर शेकाप आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वातील सांगोला विकास आघाडीने आपले निर्विवाद वर्चस्व निर्माण केले आहे. 14 पैकी 9 जागा जिंकून पंचायत समितीवर सत्ता मिळवली.
वाळव्यात जयंत पाटलांचे वर्चस्व
तालुकानिहाय निकालात अनेक ठिकाणी स्थानिक नेत्यांचे वर्चस्व स्पष्ट झाले. वाळवा तालुक्यात आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने 11पैकी 8 जागा जिंकल्या. पलूस व कडेगावमध्ये आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी सर्व 8 जागा जिंकून आपले बालेकिल्ले कायम ठेवले. तासगाव व कवठेमहांकाळमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार) चे आमदार रोहित पाटील यांनी 8 जागा जिंकत वर्चस्व राखले.
सांगलीत राष्ट्रवादीचे वर्चस्व; अजितदादा गट किंगमेकर
जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष 18 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपने 16 जागा मिळवत दुसरे स्थान पटकावले. 61 सदस्यीय सभागृहात बहुमतासाठी 31 जागांची गरज असून महाविकास आघाडीकडे 30 जागा आहेत. अजितदादा गटाकडे पाच जागा असून सत्ता स्थापनेसाठी ते किंगमेकर ठरणार आहेत. अजितदादा गटाला सोबत घेतल्यास मित्रपक्षांसह महायुतीचे संख्याबळ 31 वर जाईल.
परभणीकरांनी घराणेशाही नाकारली
परभणी जिह्यात भाजप नेते माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांनी मुलगा, सून, मुलगी आणि दोन पुतणे असे आपल्या 5 नातेवाईकांना जिल्हा परिषद निवडणुकांच्या मैदानात उतरवलं होतं. मात्र, परभणीकरांनी घराणेशाही नाकारली. 5 पैकी 4 जणांना पराभव पत्कारावा लागला असून त्यांचा एक पुतण्यात कॉँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाला आहे.
मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना धक्का
सातारा जिह्यातील जावळी तालुक्यात मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना चांगलाच धक्का बसला आहे. कुसुंबी जिल्हा परिषद गटात अर्चना ज्ञानदेव रांजणे यांचा पराभव झाला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक असलेले ज्ञानदेव रांजणे यांच्या पत्नीचा पराभव झाला.
मंत्री जयकुमार गोरे यांना दोन धक्के
भाजप नेते मंत्री जयकुमार गोरे यांना मोठा धक्का बसला. जयकुमार यांचे बंधू अरुण गोरे यांचा माण तालुक्यातील कुकुडवाड गटात पराभव झाला, तर औंध गटात बंधू अंकुश गोरे यांच्या पत्नी भारती यांना 40 मतांनी पराभव पत्करावा लागला.
> मोहोळमध्ये कुरुल जिल्हा परिषद गटातून अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, तर नरखेड गटातून त्यांचे बंधू संतोष पाटील उमेदवार होते. या दोघांचानाही परभाव पत्करावा लागला.
पुण्यात अजितदादा गटाचा भाजपला धोबीपछाड
पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाने निर्विवाद बहुमत मिळवत भाजपला धोबीपछाड दिला. पुणे आणि पिंपरी महापालिकेत भाजपने सत्ता काबीज केल्याने जिल्हा परिषदेत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अजितदादा गटाने 73 पैकी 51 जागा जिंकत जिल्हा परिषदेवर निर्विवाद वर्चस्व मिळवले.
एकूण जागा – 731
भाजप – 225
शिवसेना – 43
अ.प.गट – 165
राष्ट्रवादी – 26
शिंदे गट – 162
काँग्रेस – 55
Comments are closed.