BJP Baban Lonikar controversial statement and Sanjay Raut criticized


मुंबई : भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले. “नरेंद्र मोदींनी तुझ्या बापाला पेरणीला 6000 रुपये दिले आहेत. तुझ्या अंगावरचे कपडे, आणि पायातील बुट चप्पल सुद्धा सरकारमुळेच आले आहे.” असे ते जालन्यातील एका कार्यक्रमात म्हणाले. यावर आता विरोधक आक्रमक झाले असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. “महाराष्ट्राची जनता स्वाभिमानी आहे, लाचार नाही. बबन लोणीकरांना हे जर काळात नसेल तर अशा प्रकाराची लोकं भाजपमध्ये आहेत. हे महाराष्ट्राच्या जनतेने समजून घेतले पाहिजे. हे लोकं महाराष्ट्राच्या जनतेला लाचार समजत आहेत, अस्वाभिमानी समजत असून ही एक गंभीर गोष्ट आहे.” असे म्हणत त्यांनी टीका केली. (BJP Baban Lonikar controversial statement and Sanjay Raut criticized)

हेही वाचा : Shaktipeeth Expressway : शेतकऱ्यांना देशोधडीला लावायचे, असे फडणवीसांनी ठरवलंय का? ठाकरेंचा सवाल  

शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, “पेहलगाम हल्ल्यामध्ये अतिरेक्यांनी आमच्या 26 मायभगिनींचे कुंकू पुसले तेदेखील मोदींमुळेच झाले. पुलवामामध्ये 40 जवानांच्या हत्या झाल्या त्याही मोदींमुळेच. ट्रम्प यांच्यामुळे भारताला माघार घ्यावी लागली तेही मोदींमुळेच. मुंबईसारख्या शहरातील मोक्याची भूखंड हे अडाणीला दिले जात आहेत, तेही मोदींमुळेच. शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत, त्यांची लोकं ड्रीम प्रोजेक्टच्या नावाखाली त्यांच्या जमिनी हिसकावून घेतली जात आहेत. हे सर्व काही मोदींमुळेच. या देशात मोदींमुळे बऱ्याच गोष्टी घडत आहेत.” असे म्हणत त्यांनी बबनराव लोणीकर यांना टोला लगावत भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

भाजप आमदार लोणीकर काय म्हणाले?

जालना जिल्ह्यातील परतुर येथे सोलर योजनेच्या शुभारंभ प्रसंगी केलेल्या भाषणात आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की, “कूचवट्यावर बसून सोशल मीडियावर चर्चा करणाऱ्या कार्ट्यांच्या माईचा पगार आणि बापाचे पेन्शन बबनराव लोणीकर यांनीच केला आहे. तर नरेंद्र मोदींनी तुझ्या बापाला पेरणीला 6 हजार रुपये दिले आहेत. तुझ्या अंगावरचे कपडे, आणि पायातील बुट चप्पल सुद्धा सरकारमुळेच आले आहे,” असे वादग्रस्त विधान केले आहे. यावरून आता शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.



Source link

Comments are closed.