BJP MLA Mahesh Landge criticized Ajit Pawar in front of Devendra Fadnavis


भाजपाचे भोसरी मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांनी थेट उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच महेश लांडगे यांनी अजित पवारांवर नाव न घेता टीका केली.

पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. महायुती काही जागा सोडल्यास इतर सर्व जागांवर एकत्र निवडणूक लढणार आहे. मात्र या निवडणुकीआधी पिंपरी-चिंचवडमधील विकासाच्या मुद्द्यावरून भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये श्रेयवादाचे राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. भाजपाचे भोसरी मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांनी थेट उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच महेश लांडगे यांनी अजित पवारांवर नाव न घेता टीका केली. (BJP MLA Mahesh Landge criticized Ajit Pawar in front of Devendra Fadnavis)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज (18 जून) पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना महेश लांडगे म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहराचा कायापालट करण्यात अनेकांचे योगदान आहे. दिव्यांग भवन कोणी उभारले, याची तारीख आयुक्तांनी सांगायला हवी होती. कारण 2017ला पालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर दिव्यांग भवनासह अनेक ठिकाणी विकास झाला आहे. त्यामुळे या शहराच्या विकासात आमचंही योगदान आहे. इतरांचं योगदान आम्ही नाकारत नाहीच. परंतु या शहरातल्या नागरिकांनी जर तुमच्याकडे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट) काही दिलं नसतं, तर तुम्ही काय केलं असतं? देवळात जाऊन घंटा वाजवत बसला असता का? असे प्रश्न लांडगे यांनी विचारले.

हेही वाचा – Raj Thackeray : …तर हा महाराष्ट्र द्रोह समजू, शाळांना लिहिलेल्या पत्रात राज ठाकरेंनी काय म्हटले?

महेश लांडगे म्हणाले की, गेल्या 30 वर्षात काय केलं, हे जे-जे येऊन सांगत आहेत. ते आम्ही कुठे नाकारत आहोत. तुम्ही काम केलं आहे, पण 2017 पासून आम्ही सुद्धा विकास केलेला आहेच ना? हे तुम्ही कसं नाकारता. आम्ही केलं की भ्रष्टाचार आणि तुम्ही केलं की कामं. परंतु आम्ही याठिकाणी पारदर्शक काम करत आहोत. त्यामुळे जे चांगलं ते चांगलं बोलायला मी कोणाला घाबरत नाही. मी पैलवान आहे, त्यामुळे सर्वांना अंगावर घायची मला सवय आहे. स्पष्ट सांगताना माझं पाऊल डगमगणार नाही. देवेंद्र फडणवीस करून जातात आणि नाव दुसऱ्याचं लागतं. पण जरा माझं पण नाव कुठं तरी लिहावं. आयुक्तांना प्रोटोकॉलमध्ये बदल करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी देखील महेश लांडगे यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

मुख्यमंत्र्यांकडून महेश लांडगेंना सबुरीचा सल्ला

महेश लांडगे यांच्या भाषणानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महेश लांडगे हे खूप चिंता व्यक्त करत आहेत. आम्ही काम करतो आणि श्रेय दुसरे घेतात. पण मी सांगतो की, ‘ये पब्लिक है, ये सब जानती है.’ त्यामुळे आपण दुसऱ्याचे श्रेय घेऊ शकत नाही आणि आपलं श्रेय दुसरा कोणीही घेऊ शकत नाही. त्यामुळे फार चिंता करायची नाही आणि आपण काम करत राहायचं. जनतेचा तुमच्यावर (महेश लांडगे) विश्वास आहे. ते आपण निवडणुकीत पाहिलं आहे. जनतेने तुमच्या कामाचे श्रेय तुम्हाला दिलं आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही वाचा – Rohini Khadse on Badgujar : नवभाजपामध्ये सर्व तडजोडच, वाजपेयींचा संदर्भ देत रोहिणी खडसेंचा हल्लाबोल



Source link

Comments are closed.