CM Devendra Fadnavis Tiranga Rally in Nagpur criticized Pakistan and Congress


नागपूर : ऑपरेशन सिंदूर मोहिमेच्या यशानिमित्त नागपूरमध्ये आयोजित तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहेत. “संपूर्ण भारत देश हा भारतीय सैन्य आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी आहे. पाकिस्तानने गुडघे टेकल्यावर भारताने युद्धविराम केला आहे. सुन ले बेटा पाकिस्तान, बाप है तेरा हिंदुस्तान…” असे म्हणत त्यांनी पाकिस्तानवर आणि दहशतवादावर भाष्य केले. नागपूरमधील खापरखेडा येथे काढण्यात आलेल्या या रॅलीत त्यांनी कॉंग्रेसवरही निशाणा साधला. (CM Devendra Fadnavis Tiranga Rally in Nagpur criticized Pakistan and Congress)

हेही वाचा : Sanjay Raut : पंतप्रधान मोदींकडून काश्मीर प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयकरण; शिवसेना ठाकरे गटाचे गंभीर आरोप 

खापरखेडा येथील अन्नामोड या चौकातून ही तिरंगा यात्रा सुरू झाली होती. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुमारे एक किलोमीटर या यात्रेत सहभागी झाले. तिरंगा यात्रा संपुष्टात आल्यानंतर त्या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केले. “ऑपरेशन सिंदूर यशस्वी करताना भारतीय सैन्याने पाकिस्तानचा एकही हल्ला सफल होऊ दिला नाही. देशातच निर्माण केलेली शस्त्रे वापरून जिंकलेल्या या युद्धाने भारताची ताकद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारता’ची झलक संपूर्ण जगाला दिसली. ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

“प्रत्येकाच्या हृदयात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करण्यासाठी तसेच आपल्या वीर जवानांप्रती कृतज्ञता प्रतीत व्हावी यासाठी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असणाऱ्या पाकिस्तानला पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात ऑपरेशन सिंदूर राबवत चोख उत्तर दिले आहे. देशावर झालेला कोणताही हल्ला यापुढे सहन केला जाणार नाही. त्याला तात्काळ कडक उत्तर दिले जाईल, हा संदेश या निमित्ताने आपण दिला. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी शौर्य गाजवणाऱ्या आपल्या वीर जवानांप्रती तिरंगा यात्रेच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त करूया,” असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले. “तुर्की सारखा देश दहशतवादाला पाठिंबा देतोय. मानवते विरुद्धचा हा अपराध आहे. त्या विरोधात भारतीयांनी व्यवहार करण्यास नकार दिला, त्या बद्दल मी भारतीयांचे स्वागत करतो,” असेही ते पुढे म्हणाले.

राजकीय यात्रा करू नये, कॉंग्रेसवर निशाणा

“काँग्रेसने जय हिंद यात्रा काढली आहे. आमची अपेक्षा एवढीच असेल की त्यांनी ती यात्रा राजकीय यात्रा करू नये. आपल्या सेनेवर प्रश्नचिन्ह निर्माण करू नका. ज्या पद्धतीने राहुल गांधी बोलायला लागले आहेत, भारतीय सेनेप्रती अविश्वास त्यांच्या बोलण्यातून दिसत आहे. एकीकडे सेनेवर अविश्वास दाखवतात, दुसरीकडे जय हिंद यात्रा काढतात. जय हिंद तेव्हाच म्हणता येईल जेव्हा सेनेच्या पाठीशी तुम्ही विश्वास दाखवाल.” असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.



Source link

Comments are closed.