Country’s first radio festival in Mumbai, Asha Radio Awards to be presented on June 21 in marathi


Radio Festival : मुंबई : जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधत येत्या 21 जून रोजी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देशातील पहिलाच सृजनशील आणि सांस्कृतिक महाराष्ट्र रेडिओ महोत्सव तसेच महाराष्ट्र आशा रेडिओ गौरव पुरस्कार 2025चे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी मंगळवारी ही माहिती दिली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात संध्यकाळी साडेचार वाजता आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 12 रेडिओ पुरस्कारांचे वितरणही करण्यात येणार आहे. (country’s first radio festival in Mumbai, Asha Radio Awards to be presented on June 21)

रेडिओ क्षेत्राला गौरव देणारा हा ऐतिहासिक उपक्रम आहे. राज्याची सांस्कृतिक, ऐतिहासिक परंपरा जपण्याचे काम रेडिओमार्फतच झाले आहे. महाराष्ट्रात जशी आकाशवाणीने भूमिका निभावली आहे. तसेच खासगीकरणाच्या काळात खासगी एफएम चॅनेल आणि कम्युनिटी रेडिओनेही आपले महत्त्व अधोरेखित केले आहे. मराठी संगीत, गाणी, शास्त्रीय संगीत जपणारे, उद्यमशील आणि सृजनशील रेडिओ चॅनलला प्रोत्साहन मिळावे यासाठी हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे शेलार यांनी यावेळी सांगितले.

मराठी निवेदक, मराठी अभिनेते, संगीतकार, गीतकार, लेखक, तंत्रज्ञ, संपादक यांना एक व्यासपीठ मिळावे. त्यांच्या माध्यमातून मराठी कला, साहित्य, संस्कृतीचे जतन करण्यात यावे. तसेच ज्या रेडिओच्या माध्यमातून केवळ मनोरंजन नाही तर प्रबोधन, राजकारण, सामाजिक जाणीव यासाठी भरीव योगदान दिले आहे त्यांना या माध्यमातून योग्य सन्मान देण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याचेही शेलार म्हणाले.

या 12 रेडिओ पुरस्कारात आशा रेडिओ गौरव पुरस्कार हा संगीत क्षेत्रातील अग्रगण्य नाव असणाऱ्या “महाराष्ट्र भूषण आशा भोसले” यांच्या नावाने देण्यात येणार आहे. आशा भोसले यांचे संगीत क्षेत्रातील एकूण योगदान लक्षात घेता हे नाव देण्याचे शासनाने निश्चित केल्याचे आशिष शेलार यांनी यावेळी स्पष्ट केले. या 12 पुरस्कारांमध्ये सर्वोकृष्ट रेडिओ केंद्र, सर्वोत्कृष्ट कम्युनिटी रेडिओ केंद्र, सर्वोत्कृष्ट रेडिओ मनोरंजन कार्यक्रम, सर्वोत्कृष्ट रेडिओ सामाजिक कार्यक्रम, सर्वोत्कृष्ट रेडिओ पुरुष निवेदक, सर्वोत्कृष्ट रेडिओ महिला निवेदक, सर्वोत्कृष्ट नवोदित रेडिओ निवेदक, सर्वोत्कृष्ट रेडिओ मराठी निवेदक, सर्वोत्कृष्ट सामाजिक उत्तरदायित्व भान असणारा कार्यक्रम, आणि सर्वोत्कृष्ट स्टोरी टेलिंग कार्यक्रम यांचा समावेश आहे.

हेही वाचा – Bridge Collapse : पूल, साकवांचे स्ट्रक्चरल ऑडिट करा, बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची सूचना

जीवनगौरव पुरस्कार वगळता इतर पुरस्कार हे नामनिर्देशनाद्वारे घोषित करण्यात येतील. यासाठी संबंधित कलाकार, तंत्रज्ञ, रेडिओ केंद्र यांनी विहित नमुन्यातील माहिती संचालनालयास सादर करावी लागेल. मानचिन्ह, शाल आणि भेटवस्तू असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. यासाठी रेडिओ क्षेत्रातील तज्ज्ञ कलाकार तंत्रज्ञ अभ्यासक यांसारख्या शासकीय सदस्यांच्या माध्यमातून पुरस्कार मूर्तींची निवड करण्यात येईल, असेही आशिष शेलार यांनी सांगितले.





Source link

Comments are closed.