Eknath Khadse spoke clearly about Ajit Pawar joining the NCP
माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि डॉ. सतीश पाटील या नेत्यांसह त्यांच्या समर्थकांनी अजित पवार गटात प्रवेश केल्यामुळे शरद पवार गटाला जळगावमध्ये आधीच मोठा धक्का बसला आहे. यानंतर जळगावातील आणखी काही नेते अजित पवार गटात जाणार असल्याचे बोलले जात आहे. यात एकनाथ खडसे यांच्या नावाचीही चर्चा आहे. यावर आता खडसे यांनी स्वत: प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे हे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र आता एकनाथ खडसे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. कारण माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि डॉ. सतीश पाटील या नेत्यांसह त्यांच्या समर्थकांनी अजित पवार गटात प्रवेश केल्यामुळे शरद पवार गटाला जळगावमध्ये आधीच मोठा धक्का बसला आहे. यानंतर जळगावातील आणखी काही नेते अजित पवार गटात जाणार असल्याचे बोलले जात आहे. यात एकनाथ खडसे यांच्या नावाचीही चर्चा आहे. यावर आता खडसे यांनी स्वत: प्रतिक्रिया दिली आहे. (Eknath Khadse spoke clearly about Ajit Pawar joining the NCP)
माध्यमांशी संवाद साधताना एकनाथ खडसे म्हणाले की, अजित पवार यांच्या पक्षात जळगावातील काही नेतेमंडळी गेली आहेत. ज्यांना जायचे होते ते गेले आहेत आणि ज्यांना नाही जायचे ते आमच्या सोबत राहिले आहेत. त्यामुळे आता आणखी काही नेते अजित पवार गटात जातील असे मला वाटत नाही. आम्ही सर्व आता शरद पवारांसोबत आहोत. आज तरी असा कुठलाही गट अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता नाही आणि माझ्या जाण्याबद्दल बोलाल तर चर्चांना काहीच अर्थ नाही, असे खडसे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – Congress : …त्या चिल्लर देशाला एवढा भाव देण्याची गरज काय? मोदींच्या भाषणावर वडेट्टीवारांची टीका
एकनाथ खडसे म्हणाले की, अजित पवार यांचा गट ज्यावेळेस वेगळा झाला होता, त्याचवेळी ज्यांना जायचे होते ते सर्व आमदार अजित पवार गटात सामील झाले होते. त्या कालखंडात मला देखील निरोप देण्यात आला होता, तुम्ही अजित पवार गटात या. परंतु, त्यावेळेस मी अजित पवार गटात गेलो नाही. मी शरद पवारांसोबतच राहिलो आणि आताही त्यांच्यासोबतच राहणार आहे, असे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले.
शरद पवारांचे निर्देश माझ्यासाठी अंतिम
एकनाथ खडसे म्हणाले की, शरद पवार जे निर्णय घेतील, त्यानुसार माझाही निर्णय असेल. त्यामुळे कार्यकर्त्यांनी या सर्व चर्चांकडे लक्ष न देता, पक्ष विस्तार कसा होईल यावर भर द्यावा. कारण शरद पवार यांचे निर्देशच माझ्यासाठी अंतिम असतील, असे स्पष्ट करत एकनाथ खडसे यांनी शरद पवारांची साथ सोडणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला.
हेही वाचा – Cabinet Meeting : राज्यात पथक योजनेस मान्यता, मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले सहा महत्त्वाचे निर्णय
Comments are closed.