Maharashtra players impressive success in Khelo India Youth Games, congratulations from Deputy CM Ajit Pawar


मुंबई : महाराष्ट्राने 58 सुवर्ण, 47 रौप्य, 53 कांस्य असे एकूण 158 पदकांची लयलूट करत ‘खेलो इंडिया युवा स्पर्धेत’ सलग तिसऱ्यांदा अव्वल स्थान मिळविले. स्पर्धेच्या विजेते पदाची हॅटट्रिक ही राज्याच्या क्रीडा क्षेत्राच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या पथकातील खेळाडू व सर्व सदस्यांचे अभिनंदन केले आहे. सर्व पदक विजेत्या खेळाडूंच्या कामगिरीत उत्तरोत्तर प्रगती होत राहील, असा विश्वास व्यक्त करीत त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. (Maharashtra players impressive success in Khelo India Youth Games, congratulations from Deputy CM Ajit Pawar)

‘खेलो इंडिया युवा स्पर्धे’तील यशाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, बिहारमध्ये झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राने केलेली नऊ स्पर्धा विक्रमांची नोंद कौतुकास्पद आहे. स्पर्धेतल्या 27 पैकी 22 खेळांमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पदके जिंकली आहेत. अ‍ॅथलेटिक्समध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक दहा सुवर्णपदके मिळाली. जलतरण स्पर्धेत सात सुवर्ण पदकांसह महाराष्ट्राने 29 पदके जिंकली. राज्याला जिम्नॅस्टिक्स आणि नेमबाजीत प्रत्येकी सहा, वेटलिफ्टिंगमध्ये पाच तसेच कुस्ती, सायकलिंग, नेमबाजीचीही सुवर्णपदके मिळाली. या युवा खेळाडूंच्या कामगिरीतून प्रेरणा घेऊन अधिकाधिक युवक खेळांकडे वळतील. परिश्रमाने उत्तम खेळाडू बनतील. राज्याच्या क्रीडा संस्कृतीला समृद्ध आणि राज्याला निरोगी, सुदृढ ठेवण्यासाठी ही कामगिरी मदत करेल, असा विश्वास व्यक्त करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व खेळाडूंना त्यांच्या उज्ज्वल कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा… Running Vs Training Shoes :  रनिंग शूज आणि ट्रेनिंग शूजमध्ये फरक काय?

गतविजेत्या महाराष्ट्राने अपेक्षेप्रमाणे सर्वोत्तम कामगिरी करीत खेलो इंडिया युवा स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपदाच्या हॅट्ट्रिकाचा पराक्रम केला आहे. 58 सुवर्ण, 47 रौप्य, 53 कांस्य अशी एकूण 158 पदकांची लयलूट करीत महाराष्ट्राने अव्वल स्थानाचे शिखर सर केले. तब्बल 9 स्पर्धा विक्रमांचा पराक्रमही महाराष्ट्राने यंदाच्या 7व्या खेलो इंडिया स्पर्धेत केला आहे. पाटलीपुत्र क्रीडा संकुलातील समारोप समारंभात बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी व केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते महाराष्ट्राला विजेतेपदकाचा करंडक देऊन गौरविण्यात आले. पथकप्रमुख महादेव कसगावडे, सहाय्यक संचालक भाग्यश्री बीले, क्रीडाधिकारी अरूण पाटील, शिवाजी कोळीसह मराठमोळ्या खेळाडूंनी विजेतेपदाचा करंडक स्वीकारला. करंडक स्वीकारल्यानंतर महाराष्ट्राच्या जयघोषाने परिसर दुमदुमला.



Source link

Comments are closed.