Ncp sp leader rohini khadse slams bjp over sudhakar badgujar entry in marathi
भाजपची वॉशिंग मशीन अशी काही फिरली की बडगुजर चकाचक झाले. कधीकाळी ज्यांना हिरवे वाटत होते, ते भगवामय झाले, अशा शब्दात रोहिणी खडसे यांनी भाजप आणि बडगुजर यांना पक्षात प्रवेश देण्याच्या निर्णयावर टीका केली आहे.
Rohini Khadse : मुंबई : ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते सुधाकर बडगुजर यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीच्या दोन दिवसांनी शिवसेना ठाकरे पक्षाने बडगुजर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत हकालपट्टी केली. पक्षाकडून झालेल्या कारवाईमुळे सुधाकर बडगुजर नाराज झाले. त्यानंतर ते भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, नाशिकमधील भाजपा आमदार सीमा हिरे यांनी सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला जोरदार विरोध केला. तरीही आज मंगळवार, 17 जून रोजी सुधाकर बडगुजर यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसोबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन आणि रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. बडगुजर यांच्या भाजप प्रवेशावरून चांगलेच राजकारण रंगले आहे. (ncp sp leader rohini khadse slams bjp over sudhakar badgujar entry)
सुधाकर बडगुजर यांच्या भाजपातील प्रवेशाने नाशिकमधील स्थानिक पदाधिकारी नाराज आहेत. आता यावरूनच राजकीय आरोप – प्रत्यारोप रंगत आहेत. भाजपा आमदार तसेच मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी डिसेंबरमध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात थेट विधानसभेत बडगुजर यांच्यावर आरोप करत एकच खळबळ उडवून दिली होती. साधारणपणे दीड वर्षांपूर्वी, 15 डिसेंबर 2023 रोजी नितेश राणे यांनी सुधाकर बडगुजर यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम कुत्ता याच्यासोबत संबंध असल्याचा आरोप थेट विधानसभेत केला होता. मात्र, आता त्याच बडगुजर यांना भाजपाने प्रवेशात घेतल्यावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या रोहिणी खडसे यांनी भाजपवर टीका केली आहे.
सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये रोहिणी खडसे म्हणतात, ज्या बडगुजरांवर, दाऊदचा हस्तक सलीम कुत्ता सोबत पार्टी केल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला होता. हिंदू धर्माशी, देशाशी गद्दारी वगैरे बोलले गेले होते, त्याच सुधाकर बडगुजरांचा आज भाजपात प्रवेश झाल्याचे खडसे म्हणतात. नितीश कुमार तर उगाच बदनाम आहे त्यांच्या पेक्षा मोठे पलटूराम महाराष्ट्रात आहेत, अशी टीका देखील खडसे यांनी केली आहे. भाजपची वॉशिंग मशीन अशी काही फिरली की बडगुजर चकाचक झाले. कधीकाळी ज्यांना हिरवे वाटत होते, ते भगवामय झाले, अशा शब्दात रोहिणी खडसे यांनी भाजप आणि बडगुजर यांना पक्षात प्रवेश देण्याच्या निर्णयावर टीका केली आहे.
हेही वाचा – Supriya Sule : हा तर प्रचंड गलथानपणा…सुप्रिया सुळेंचा एअर इंडियाविरोधात संताप
वास्तविक, गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीच्या आधी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी इंडि आघाडीतून बाहेर पडून नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला होता. तेव्हापासून नितीश कुमार यांना पलटूराम म्हटले जाते. मात्र, भाजपाने आज बडगुजरांना पक्षात प्रवेश देत नितीशकुमार यांच्यापेक्षा आपण मोठे पलटुराम असल्याचे दाखवून दिल्याचे खडसे यांनी म्हटले आहे.
Comments are closed.