Praveen Darekar heads the study group appointed for self-redevelopment of cooperative housing societies


– प्रेमानंद बच्छाव

मुंबई : राज्यातील 30 वर्ष जुन्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या इमारतींच्या स्वयंपुनर्विकासाला राज्य सरकारने यापूर्वीच मंजूरी दिली असली तरी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने अभ्यासगट नियुक्त केला आहे. भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखालील अभ्यासगटात अकरा सदस्यांचा समावेश आहे. हा अभ्यासगट स्वयंपुनर्विकासासाठी पुरेसे अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याबाबत तसेच अर्धवट रखडलेल्या प्रकल्पांचा स्वयंपुनर्विकास करता येईल काय, आदींचा अभ्यास करून सरकारला तीन महिन्यांत अहवाल सादर करणार आहे. (Praveen Darekar heads the study group appointed for self-redevelopment of cooperative housing societies)

सहकारी गृहनिर्माण संस्थांचा पुनर्विकास हा अनेकदा बांधकाम व्यावसायिकांमुळे रखडत असल्याचे समोर आले आहे. तसेच संस्थेच्या सभासदांऐवजी विकासकालाच होणार लाभ, घरांचा ताबा देण्यास होणारा विलंब पाहता स्वयंपुनर्विकासाला चालना देण्यासाठी सरकारने धोरण निश्चित करावे, अशी मागणी जोर धरू लागली होती. त्यानुसार राज्यातील नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाला चालना देण्याच्यादृष्टीने द्यावयाच्या सवलतीचे प्रमाण आणि स्वरूप कसे असावे याबाबत मार्च 2019 मध्ये गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती.

या समितीने सहकारी गृहनिर्माण संस्थांना त्यांच्या इमारतींचा स्वयंपुनर्विकास करण्यासाठी 30 वर्षे आणि त्यापेक्षा अधिक जुन्या इमारतींना पात्र ठरविल्या होत्या. तसेच स्वयंपुनर्विकासासाठी एक खिडकी योजना, चटईक्षेत्र निर्देशांक, प्रोत्साहन क्षेत्रफळ, आवश्यक रस्ता, प्रिमियम दरामध्ये सवलत, योजनेचा कालावधी, कर्जाच्या व्याजदरात सवलत आदी 20 बाबींच्या शिफारशी सरकारला केल्या होत्या. आता या शिफारशींच्या प्रभावी अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आणि त्या अनुषंगाने स्वयंपुनर्विकासाला चालना देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सुचविण्यासाठी अभ्यासगट नेमण्यात आला आहे. गृहनिर्माण विभागाने गुरुवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला.

हेही वाचा – Pahalgam Attack : राऊतांनी शहांचा राजीनामा मागितला; नितेश राणे म्हणतात, शेंबड्या लोकांना तुम्ही…

प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या अभ्यासगटामध्ये शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार आणि श्री सिध्दीविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर, म्हाडाचे मुख्य अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबई इमारत आणि दुरुस्ती मंडळाचे मुख्य अधिकारी, मुंबई महानगरपालिकेचे उपआयुक्त, एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त, मुंबई शहरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी-उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकारी, सिडकोचे व्यवस्थापक, वित्त विभागाचे सह-उप संचालक, वित्त आणि लेखाधिकारी संवर्गातील अधिकारी हे सदस्य तर सदस्य सचिव म्हणून मुंबई शहरचे जिल्हा उपनिबंधक यांचा समावेश करण्यात आला आहे.

हा अभ्यासगट स्वयंपुनर्विकास प्रकल्प यशस्वी होण्यासाठीची कार्यपध्दती-मार्गदर्शक सूचना तयार करणार असून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, शासकीय, महानगरपालिका इत्यादी भूखंडावरील संस्थांकरीता स्वयंपुनर्विकास योजना राबविण्यासाठी शिफारस करण्याबरोबरच ज्या संस्था विकासकाविरोधात कायदेशीर खटल्यात गुंतल्या आहेत आणि अर्धवट राहिले आहेत अशा प्रकल्पांबाबत आवश्यक उपाययोजना सुचविणार आहे. तसेच रखडलेल्या प्रकल्पांचा स्वयंपुनर्विकास करता येईल का, आदी गोष्टींबाबत तीन महिन्यात सरकारला शिफारशी करणारा अहवाल देणार आहे.

हेही वाचा – Sanjay Gaikwad : आतंकवाद्यांचे मेसेज समजण्यासाठी…; संजय गायकवाड यांच्या वक्तव्याने राजकारण तापणार



Source link

Comments are closed.