Pune Crime Fortuner received as dowry seized, action against Hagavane family begins in Vaishnavi suicide case


राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक (वय वर्ष 23) हिने शुक्रवारी (ता. 16 मे) राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिच्यावर करण्यात आलेला छळाची सर्व माहिती हळूहळू समोर येऊ लागली आहे.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक (वय वर्ष 23) हिने शुक्रवारी (ता. 16 मे) राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सुरुवातीला वैष्णवी नेमकी कोण आहे? याबाबतची कोणतीही माहिती समोर आली नव्हती. परंतु, घटनेच्या काही वेळातच सदर महिला ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून असल्याची माहिती समोर आली. ज्यानंतर राजकारणात खळबळ उडाली. वैष्णवी हिने तिच्या सासरच्या जाचाला कंटाळून आपल्या जीवनाचा शेवट केल्याची माहिती समोर आली आहे. ज्याप्रकरणी राजेंद्र हगवणे, सासू लता, नणंद करिश्मा, दीर सुशील आणि नवरा शशांक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर आता पोलिसांकडून वैष्णवीच्या माहेरच्यांनी हगवणे कुटुंबाला जी फॉर्च्युनर दिली होती, ती जप्त करण्यात आली आहे. (Pune Crime Fortuner received as dowry seized, action against Hagavane family begins in Vaishnavi suicide case)

राजेंद्र हगवणे यांचा मुलगा शंशाक हगवणे याच्यासोबत वैष्णवीचा प्रेमविवाह झाला होता. या लग्नावेळी राजेंद्र तुकाराम हगवणे यांनी मुलीच्या घरच्यांकडून 51 तोळे सोने, फॉर्च्युनर गाडी, चांदीची भांडी घेतली होती. इतकेच नाही तर सनीज वर्ल्ड या पुण्यातील सर्वात महागड्या ठिकाणी लग्न करून देण्याच्या अटीवरच हा लग्नसोहळा पार पाडला होता, अशी माहिती या एफआयआरच्या माध्यमातून समोर आली आहे. पोलिसांनी मुळशीतील घरी जाऊन वैष्णवीच्या वडिलांनी हुंड्यात दिलेली फॉर्च्युनर आणि ऍक्टिव्हा गाडी जप्त केली आहे. MH 14 KU 2002 हा वैष्णवीच्या घरच्यांनी दिलेल्या पांढऱ्या रंगाच्या फॉर्च्यूनर कारचा नंबर आहे. पण इतके सगळे काही देऊनही हगवणे सासरमधील सर्वांनीच वैष्णवीला छळले असल्याचा आरोप तिच्या कुटुंबाकडून करण्यात आला आहे.

हेही वाचा… Pune Crime : 51 तोळे सोने, फॉर्च्युनर देऊनही व्हायचा वैष्णवीचा छळ, राष्ट्रवादी नेत्याच्या सुनेच्या आत्महत्येची धक्कादायक कारणे

वारंवार होण्याला छळाला आणि मानसिक त्रासाला कंटाळून वैष्णवीने 27 नोव्हेंबर 2023 रोजी विषारी औषध पिऊन आत्महत्येचाही प्रयत्न केला होता, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता अखेरीस पतीकडून सुद्धा चारित्र्यावर संशय घेण्यात येऊ लागल्याने आणि सासरच्यांना सर्व काही देऊन सुद्धा त्रास कमी न झाल्याने वैष्णवीने आपल्या जीवनाचा शेवट केला आहे. या प्रकरणी वैष्णवीची सासू, नणंद आणि पती शशांक यांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने आज (ता. 21 मे) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस अटक आरोपींची कसून चौकशी करीत आहेत. तर, राष्ट्रवादीचा नेता असलेले राजेंद्र हगवणे, दीर सुशील हगवणे हे अद्यापही फरार असून पोलिसांकडून त्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे.



Source link

Comments are closed.